शिकवा नंतर; आधी वेळेत मूल्यांकन.. विद्यापीठाचा प्राध्यापकांवर रेटा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लावण्यासाठी राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची मुदत संपण्यास सात-आठ दिवसच उरले असताना निकालासाठी विद्यापीठाची प्रचंड धावपळ सुरू आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करायचेच, असा जणू विडाच विद्यापीठाने उचलला असून, प्राध्यापकांना मूल्यांकनाचा एककलमी कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे, आज, सोमवारपासून येत्या गुरुवापर्यंत चार दिवसांची ‘अध्ययन सुट्टी’ जाहीर करण्यात आली आहे. हे चार दिवस महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे कुठलेही काम होणार नाही!

उत्तरपत्रिकांच्या संगणकआधारित ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनाबाबतच्या कुलगुरूंच्या दुराग्रही निर्णयाचा फटका प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनाही बसत आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत; तर प्राध्यापक मूल्यांकनात व्यग्र असल्यामुळे महाविद्यालय सुरू होऊनही अध्ययन होत नसल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय घेण्यास उशीर लावला आणि सर्व गोंधळ सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांनी याची दखल घेत विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करावेत, अशी तंबी दिली.

विद्यापीठात १८ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाते. दिलेल्या मुदतीत एवढय़ा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करायचे असेल तर दिवसाला ६० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीत विद्यापीठासाठी ती अशक्य कोटीतील बाब आहे. महाविद्यालये नियमित सुरू झाल्यामुळे प्राध्यापकांना सकाळचा वेळ महाविद्यालयात अध्ययन करून मग मूल्यांकनाचे काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत चार दिवस महाविद्यालयात न शिकविता उत्तरपत्रिका तपासण्याकरिता प्राध्यापकांना मुभा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्राचार्याना करत होते. मात्र त्याला फारसा कोणी प्रतिसाद न दिल्याने अखेर शनिवारी विद्यापीठानेच परिपत्रक काढून २४ ते २७ जुलै या कालावधीत ‘अध्ययन सुट्टी’ जाहीर केली.

यंदा निकाल लागण्यास खूपच उशीर झाला आहे. याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार असले तरी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन निकाल लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करावा. याचबरोबर विद्यापीठानेही प्राध्यापकांना कारवाईची धमकी न देता हा निर्णय घेण्यास लागलेला उशीर व नंतर झालेली दिरंगाई या सर्वाला कोण जबाबदार आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. निकाल न लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाने आणि प्राध्यापकांनी आपापसातील मतभेद विसरून काम करावे व नंतर दिरंगाईबद्दल कारवाई करावी.

– सुधाकर तांबोळी, उपाध्यक्ष,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व अधिसभेचे माजी सदस्य

..अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

* ज्या प्राध्यापकांवर मूल्यांकनाची जबाबदारी आहे त्यांनी या कालावधीत मूल्यांकन केंद्रांवर जाऊन त्यांना दिलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी दिवसाला किमान सहा तास तरी मूल्यांकन करावे, असे विद्यापीठाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

* जे प्राध्यापक मूल्यांकन केंद्रावर पोहोचणार नाहीत, किंवा त्यांना दिलेले काम पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

* प्राध्यापकांची उपस्थिती कळविण्याची जबाबदारी संबंधित विषयाच्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात आली आहे. सर्व प्राध्यापकांनी त्यांचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या विषयाच्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांकडून घेणे बंधनकारक आहे.

बालहट्ट आणि आता वेठबिगारी

‘विद्यापीठ प्रशासनाने सुरुवातीला बालहट्ट केला आणि उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय घेतला.  त्रुटींमुळे आता  हा नवीन फतवा काढून शिक्षकांना वेठबिगारी करायला लावण्यासारखे आहे’, असे मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक संघटनेचे (बुक्टु) सहसचिव चंद्रशेखर एस. कुलकर्णी यांनी  सांगितले. ‘प्राध्यापक बारा तास बसले तरी  मूल्यांकन होणे अवघड आहे.  विद्यापीठाने तांत्रिक त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करावेत’, असे ते म्हणाले.