डेरेदार वृक्षराजींनी बहरलेला परिसर म्हणजे विविध पक्ष्यांसाठी हक्काचे निवासस्थान. या झाडांवर घरटे बांधणे हा त्यांचा खरे तर निसर्गदत्त हक्क. मात्र, त्याचा त्रास मनुष्यप्राण्याला होत असेल तर थेट डेरेदार वृक्षांवरच कारवाईची कुऱ्हाड पडते. असाच काहीसा प्रकार मुंबई विद्यापीठ परिसरात घडला आहे. झाडांवरील पक्ष्यांच्या आवाजाने विद्यापीठ परिसराची शांतता भंग पावते म्हणून विद्यापीठाच्या कलिना संकुलातील एक-दोन नव्हे तर तब्बल १५ झाडांना पूर्णपणे निष्पर्ण करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कलिना संकुलातील पश्चिम विभागीय इन्स्ट्रमेंटेशन केंद्रासमोरील (डब्लूआरआयसी) रस्त्यावरील बहरलेल्या १५ झाडांच्या फांद्या अचानक छाटण्यात आल्या. संकुलात असलेल्या झाडांवर वटवाघळांची वस्ती तयार झाली असून त्यांच्या आवाजाने परिसराची शांतता भंग पावत असल्याच्या तक्रारी आल्याने ही कत्तल केली गेली, असा उफराटा खुलासा विद्यापीठाने केला. या कत्तलीच्या निषेधार्थ ‘मुंबई विद्यापीठ बचाव’ गटातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बुधवारी आंदोलन केले. यामध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर हेही सहभागी झाले होते. या झाडांवर वटवाघळांची एक वस्तीच तयार झाली होती. वटवाघळांचीही वस्ती प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्राशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी अभ्यासचा विषय होता, असे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.