सरासरी गुणांची प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये सुमारे १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा तोडगा मुंबई विद्यापीठाने काढला असला तरी इतक्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देणे इतके सोपे नसल्याचे परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांच्या आता लक्षात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या इतर विषयांच्या गुणांची छाननी, हजेरीपटाची पडताळणी यांसारख्या अनेक बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने सरासरी गुण देण्याचे काम हे अजूनच गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे हे सरासरीचे गणित सोडविण्याचे मोठे आव्हान आता विद्यापीठापुढे उभे राहिले आहे.

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने राखून ठेवले आहेत. परीक्षा होऊन पाच महिने उलटले तर या उत्तरपत्रिकांचा शोध लागत नसल्याने या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय विद्यापीठाने २९ सप्टेंबर रोजी जाहीर केला. विद्यापीठाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात इतक्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. सरासरी गुण देण्याच्या अटी व नियमावलीनुसार अंमलबजावणी करण्यास विद्यापीठाने सुरुवातदेखील केली आहे. परंतु ही प्रक्रिया जटिल असल्याने परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. प्रथम ज्या विद्यार्थ्यांना अद्याप एक किंवा त्याहून अधिक विषयांचे गुण मिळालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची ज्या विषयाची उत्तरपत्रिका मिळत नाही, त्या विषयाच्या हजेरीची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयानुसार हजेरी पडताळणी करणे हे फारच क्लिष्ट काम आहे. त्यामुळे सरासरी गुण देणे जितके सोपे वाटते तितकेच ते जास्त गुंतागुंतीचे आहे, असे परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांला सरासरी गुण दिले जाऊ नयेत याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्व अटी व नियमांचे पालन योग्य रीतीने झाले आहे, याची फेरपडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत असला तरी पुढच्या आठवडय़ात बहुतांश विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले आहे. पाच विषयांच्या गुणांनुसार सरासरी गुण हे सहाव्या विषयाला दिले जाणार आहेत. यामध्ये जर कोणत्या विद्यार्थ्यांच्या एकाहून अधिक विषयाच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे आढळून आले तर कुलगुरूंच्या सल्ल्यानुसार त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही पुढे ते म्हणाले.

सरासरी गुण तरी लवकर द्या!

मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून वीस दिवस उलटले असले तरी निकाल राखीव ठेवलेल्या काही विद्यार्थ्यांना अजूनही विद्यापीठाचे हेलपाटे घालावे लागत आहेत. सरासरी गुण देण्याच्या निर्णयालाही आता आठवडा उलटला तरी विद्यापीठाकडून मात्र कोणत्याच हालचाली न झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ऑक्टोबर महिना उजाडला तरी अद्याप निकाल हातात न आल्याने हताश झालेले  विद्यार्थी अखेर ‘सरासरी गुण तरी लवकर द्या’ अशा अवस्थेला येऊन पोहोचले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी तात्पुरता प्रवेश दिला होता, त्यांनाही आता निकाल सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हातात आलेली नोकरी किंवा प्रवेश गमावण्याच्या भीतीने हे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखालून जात आहेत.