मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील जागेचे पुन्हा एकदा भूमिपूजन करण्याचा अजब निर्णय विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाने घेतला होता. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि कार्यक्रम आयत्या वेळी रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. विद्यापीठाच्या या कार्यक्रमामुळे विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र पुन्हा एकदा वादात सापडले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनातर्फे सन २०१०मध्ये जागा देण्यात आली. तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्याच जागेवर पुन्हा एकदा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्थानिक महापौर आणि आदी मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र एकदा ज्या जागेचे भूमिपूजन झाले आहे त्या जागेवर पुन्हा भूमिपूजन करण्याची काय गरज, असा प्रश्न विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा विद्यापीठाने त्या जागेवर लवकरात लकवर बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सुविधा सुरू करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. मनसेचे स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनीही भूमिपूजन कार्यक्रमावर आक्षेप घेतला, तर विद्यापीठाला २०१०मध्ये ज्या वेळेस जागा मिळाली तेव्हा त्या जागेवर आरक्षण होते. ती जागा पूर्णपणे विद्यापीठाच्या नावावर झाली नव्हती. मात्र आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून ती जमीन पूर्णपणे विद्यापीठाच्या नावावर आल्याने आता तेथे बांधकाम सुरू करण्याच्या उद्देशाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी स्पष्ट केले. मात्र आयत्या वेळी काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचेही ते म्हणाले.