मुंबई विद्यापीठ ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची रखडपट्टी

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठात ग्रंथालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला; परंतु दीड वर्ष उलटूनही अद्याप ग्रंथालयाचे बांधकाम पूर्णत्वास गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१५ साली हे ग्रंथालय बांधून तयार होणे आवश्यक होते. बांधकाम विलंबामुळे खर्चात तब्बल दोन कोटी ४७ लाख रुपयांनी वाढ झाले आहे. सुरुवातीला ग्रंथालयाचे बांधकाम २४ कोटी ८६ लाख रुपयांना देण्यात आले होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विद्यापीठाकडे कालिना संकुलात सुरू असलेल्या ग्रंथालयाच्या कामाची माहिती सहायक ग्रंथपालांकडे मागविली होती. त्यानंतर या ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तब्बल ७,७०,३६४ इतकी पुस्तके संदर्भ साहित्य म्हणून उपलब्ध होणार आहेत.

१८ फेब्रुवारी, २०१५ रोजी ग्रंथालय बांधकामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराशी झालेल्या करारानुसार हे काम नऊ महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक होते. तळमजला आणि अधिकचे दोन मजले अशी ही इमारत असून यात वाचन विभाग, अभ्यास खोली, ग्रंथ ठेवण्याची मांडणी, ई-वाचन, उद्यान आणि बैठक क्षेत्र अशी मांडणी आहे. नव्या ग्रंथालयाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आजही मोडकळीस आलेल्या ग्रंथालयातच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बसावे लागत आहे.

माहितीसही विलंबच

ग्रंथालयाचे एकूण क्षेत्रफळ १५,०३६,८६ चौरस मीटर आहे. यात एकाच वेळी ४५० व्यक्ती बसू शकतील अशी रचना आहे. ग्रंथालयासाठी अपेक्षित खर्च २४.८६ कोटी रुपये इतका होता. काम वेळेत पूर्ण होणार नसल्याने त्याला ३ जुलै, २०१७पर्यंत मुदतवाढ दिली गेली. तसेच खर्च २,४६,६०,२७४ हजार रुपयांनी वाढला आहे. या संदर्भात माहिती मागविल्यानंतर विद्यापीठाच्या अभियंता शाखेकडे तो पाठविण्यात आला होता. त्यावर अभियंता शाखेचे प्रमुख विनोद पाटील यांनी तब्बल दोन महिन्यानंतर उत्तर दिले.