कुलगुरू देशमुख यांची कबुली; यंत्रणेत बदलांचे सुतोवाच
मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी उत्तरपत्रिका घोटाळ्यास सुरक्षा व्यवस्थेतील अनास्था कारणीभूत असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मान्य करत भविष्यात सुरक्षा यंत्राणेत आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही केले. तसेच विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल राज्यपालांकडे सुपूर्द केला असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज लक्षात घेता याप्रकरणी निवृत्त न्यायधीशांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची मागणी आपण केल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले.
सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून त्यानंतरच या समितीबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या अभियांत्रिकी उत्तरपत्रिका घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या माहितीचा अहवाल आपल्याकडे मागितला आहे. त्यानुसार आपण तो अहवाल पोलिसांना दिला असल्याचे सांगतानाच याप्रकरणी २० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश असून ही सर्व नवी मुंबईतील कॉलेज असल्याचे या वेळी डॉ. देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या दोन इमारतींपकी एका इमारतीत सध्या फक्त २० सीसीटीव्ही कार्यरत आहेत. या ठिकाणी आणखीन काही सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. यासंदर्भात तत्सम संस्थांकडून अहवाल मागविण्यात आला असून १५ दिवसांत त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
अद्याप प्रकुलगुरू नाहीच
परीक्षा भवनातील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाला प्रकुलगुरू असणे गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. मात्र दहा महिने झाले तरी अद्याप प्रकुलगुरू नेमण्यात न आल्याने यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा करण्यात आली असता, आपण सरकारकडे चार प्रकुलगुरूंसाठी मागणी केली आहे. मात्र ती मान्य करण्यात आलेली नाही.