परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याकरिता मुंबई विद्यापीठ २०१४च्या दुसऱ्या सत्रापासून प्रश्नपत्रिकांवर वॉटरमार्क पद्धतीचा अवलंब करणार आहे. विद्यापीठाच्या ‘डिजिटल एक्झाम पेपर डिलीव्हरी सिस्टीम्स’चा (डीईपीडीएस) भाग म्हणून या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविली जाते. याचा पुढचा टप्पा म्हणून वॉटरमार्क पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
यात परीक्षा केंद्रांवर छापलेल्या प्रश्नपत्रिकेवर संबंधित परीक्षा केंद्राचे नाव व केंद्र क्रमांक छापून येणार आहे. त्यामुळे एखादी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर गेल्यास ती नेमकी कुठून बाहेर गेली याची माहिती मिळू शकेल. यामुळे गैरप्रकारांना आळा बसू शकेल, असा विद्यापीठाचा दावा आहे. क्लाऊड सव्‍‌र्हरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी मिळते. तासाभरात प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून, झेरॉक्स काढून त्याचे वाटप केले जाते. या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेज संबंधित संस्थांनी घेणे आवश्यक आहे. हे फुटेज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे डीव्हीडीच्या स्वरूपात पाठविले जाते. या सर्व प्रक्रियेची माहिती परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना करून देण्यात आली.