निकाल जाहीर होऊनही न मिळाल्याने मनस्ताप

संगणकाधारित (ऑनस्क्रीन) मूल्यांकनातील विलंब आणि गोंधळामुळे निकाल राखीव राहिलेल्या खालसा महाविद्यालयाच्या अस्मिता कुबल या विद्यार्थिनीचा अखेर मंगळवारी संपूर्ण निकाल हाती आला. अंतिम निकाल नसल्याने पदव्युत्तर प्रवेश संकटात सापडलेल्या अस्मिताने सांख्यिकीशास्त्रातून ९७ टक्के गुण मिळवीत अव्वल कामगिरी केली आहे. प्रथम व द्वितीय पदवी वर्षांतही अस्मिताची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली होती. मात्र, निकाल राखीव राहिल्याने गेले अनेक दिवस ती परीक्षा विभागाच्या पायऱ्या झिजवित होती. तिच्या प्रश्नावर विद्यार्थी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर अस्मिताला तिचा संपूर्ण निकाल मिळविता आला आहे. मात्र, निकाल मिळाला असला तरी तिच्या पदव्युत्तर प्रवेशाबाबत अनिश्चितता कायम आहे.

ऑगस्ट महिना उजाडला तरी अनेक पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दिलेल्या ३१ जुलैपर्यंतच्या मुदतीत काही निकाल तरी जाहीर करावे या विचाराने विद्यापीठाने विज्ञान शाखेचे काही परीक्षांचे निकाल रात्री उशिरा जाहीर केले. यामध्ये सांख्यिकीशास्त्र विषयाचा निकालही होता. निकाल जाहीर होताच मोठय़ा आनंदाने निकाल पाहण्यासाठी अस्मिताने लॉग इन केले. परंतु त्यात निकाल ‘राखीव’ असल्याचे तिला कळले.

आपल्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींचे निकाल जाहीर झाले. मग आपला निकाल राखीव का, या विचाराने ती हताश झाली. पुढचे काही दिवस वाट पाहूनही निकालाबाबत न कळल्याने तिने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे धाव घेतली. अनेक दिवस विभागात दिवसभर थांबूनही तिला निकाल राखीव का ठेवला, याचे उत्तर मिळाले नाही. तरीही तिचे हेलपाटे सुरूच होते. दरवेळेस तिला ‘पुढच्या वेळेस या’ आश्वासनाखेरीज काहीच हाती लागत नव्हते.

अस्मिताला होणाऱ्या त्रासाबद्दल वर्तमानपत्रात आलेल्या वृत्ताची दखल घेत युवा सेनेने सोमवारी ठिय्या आंदोलन करून तिचा निकाल लवकरात लवकर लावण्याची मागणी केली.

एका विषयाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन बाकी असल्याने तिचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. मंगळवारी अखेर त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करून तिला गुणपत्रिका देण्यात आली.

एकीकडे निकाल मिळण्याची चिन्हे नव्हती आणि दुसरीकडे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जाची अंतिम मुदतही जवळ येत होती. सांख्यिकीशास्त्र विषय विद्यापीठाशिवाय इतरत्र महाविद्यालयामध्ये शिकवला जात नाही. त्यात येथे ६० च जागा आहेत. निकाल लवकर मिळाला नाही तर आपले वर्ष वाया जाईल, या मानसिक दडपणाखाली मी गेले १५ दिवस वावरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निकाल मिळवण्यासाठी जी पायपीट मला करावी लागली आहे, ती कोणत्याच विद्यार्थ्यांला करावी लागू नये.

अस्मिता कुबल, विद्यार्थीनी