एकाच विषयाचे निकाल टप्प्याटप्याने; विद्यार्थ्यांच्या तणावात नवी भर

उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे ‘निकाल आणीबाणी’त सापडलेल्या मुंबई विद्यापीठाने सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत ठेवण्याऐवजी ९० टक्क्यांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झालेल्या विषयांचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच विषयाचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे ‘अंतिम मुदती’चा खेळ खेळण्यापेक्षा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यावर भर राहील आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांची फरफट होऊ नये, यासाठी समांतर यंत्रणा उभारण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली. मात्र टप्प्याटप्प्यात निकाल जाहीर केल्यामुळे निकाल न लागणाऱ्या मुलांच्या तणावात आणखी भर पडण्याची भीती आहे.

परीक्षा संपल्यानंतर तब्बल महिनाभराने ऑनलाइन मूल्यांकन सक्तीचे करण्याच्या कुलगुरू संजय देशमुख यांच्या मनमानी निर्णयामुळे यंदा लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. निकाल लांबल्याने राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विद्यापीठाचे कुलपती या नात्याने हस्तक्षेप करत निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची मुदत ठरवून दिली. मात्र या मुदतीत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने राज्यपालांनी कुलगुरू देशमुख यांना रजेवर जाण्याचे आदेश देत कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे आणि व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांच्याकडे अनुक्रमे कुलगुरू आणि प्र-कुलगुरूपदाचा तात्पुरता कार्यभार दिला. मात्र या दोघांनी सूत्रे हातात घेऊन दहा दिवस उलटले तरी विद्यापीठाला मोठय़ा परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात यश आलेले नाही.

अनेक तांत्रिक घोळामुळे काही परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण होऊनही निकाल प्रलंबित आहेत. काही विषयांच्या उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. यामुळे विज्ञान शाखेचा निकाल जाहीर होऊनही तब्बल दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित राहिले होते. मात्र ९० टक्क्यांहून अधिक मूल्यांकन झालेल्या विषयांचा निकाल जाहीर करण्याच्या निर्णयामुळे इतरही विषयांच्या विद्यार्थ्यांवर हीच वेळ ओढविण्याची शक्यता आहे.

अद्याप दीड लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बाकी असून, १२३ परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत आहेत. यामुळे राज्यपालांनी राजभवनात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू धीरेन पटेल, प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आदींच्या उपस्थितीत बैठक घेऊन मूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी प्रत्येक अधिकाऱ्याने अडचणींचाच पाढा वाचला. निकालाच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ‘मेरिट ट्रॅक’ या कंपनीच्या कार्यक्षमेतवरही या वेळी बोट ठेवण्यात आले.

या बैठकीनंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाच्या मूल्यांकन व निकालाच्या कामाचा आढावा घेताना निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील असे स्पष्ट केले. काही विद्यार्थ्यांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे निकाल रखडून राहू नयेत, यासाठी या पर्यायाचा विचार करण्यात आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे उर्वरित रखडलेल्या सुमारे १२३ विषयांचे निकाल नेमके कधी लागतील याबाबत काहीच सांगता येणे शक्य नसल्याने यापुढे निकालासाठी अंतिम मुदत ठरविली जाणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

आणखी सहा परीक्षांचे निकाल

मुंबई विद्यापीठाचे शुक्रवारी फक्त सहा परीक्षांचे निकाल जाहीर झाले. १०,००५ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि नियमन पूर्ण झाले आहे. मूल्यांकनासाठी दिवसभरात ५७५ प्राध्यापकांनी हजेरी लावली आहे. अजून १,४७,०७६ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि ४६,४७६ इतक्या उत्तरपत्रिकांचे नियमन बाकी आहे.

तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

विद्यापीठाच्या लांबलेल्या निकालांसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार असून, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन

कोणत्याही नियोजनाअभावी ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या विद्यापीठाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी विद्यापीठाच्या कलिना परिसरात मुंडन आंदोलन केले. पदवीचे रखडलेले निकाल तात्काळ जाहीर करा, विद्यार्थ्यांच्या गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा तपास लावून त्यांना न्याय द्या, पुनर्मूल्यांकनाचे शुल्क माफ करा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

गुणपत्रिका नंतर सादर करण्याची मुभा

उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ज्या विद्यार्थ्यांना ‘सामायिक प्रवेश प्रक्रिये’च्या (सीईटी) गुणांनुसार प्रवेश देण्यात आला आहे, अशा विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका सादर करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचीही संबंधिताना सूचना देण्यात येणार आहेत. ‘सामायिक प्रवेश परीक्षे’त पात्र असूनही केवळ निकालासाठी विलंब झाल्याने ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. यासाठी गरज वाटल्यास जागा वाढवण्यात येतील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थी म्हणतात..

मला विधिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. ९० टक्के  विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले तर चांगल्या महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या जागा भरतील. त्यामुळे उरलेल्या १० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता असूनही प्रवेशासाठी धडपडावे लागेल. हा आम्हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.   – ऐश्वर्या शेडगे, कला शाखेची विद्यार्थिनी

माझा निकाल जाहीर होऊन १५ दिवस झाले. बरोबरीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहेत आणि आपल्या निकालाचे काय होणार, हे माहीत नसल्याने खूप दडपण येते. राखीव ठेवलेला निकाल मिळवण्यासाठी मला गेल्या काही दिवसांत जो मानसिक त्रास झाला आहे, तो इतर विद्यार्थ्यांना होऊ नये असे मला वाटते. तेव्हा १०० टक्के विद्यार्थ्यांचा निकाल तयार असेल तर त्या विषयाचा निकाल जाहीर करा, अशी माझी विद्यापीठाला विनंती आहे.    – अस्मिता कुबल, विज्ञान शाखेची विद्यार्थिनी

सर्वच विद्यार्थी या लांबलेल्या निकालामध्ये भरडण्यापेक्षा किमान काही विद्यार्थ्यांना तरी दिलासा मिळेल. त्यामुळे ज्यांचा निकाल तयार आहे तो तरी जाहीर करा. आता विद्यार्थ्यांची सहनशक्ती संपत आली आहे.   – राहुल आरोटे, वाणिज्य शाखेचा विद्यार्थी