मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे रखडगाणे सुरूच

महिनोन्महिने पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर न करण्याचे आणि निकाल ऑनलाइन जाहीर केला तरी निकालपत्र उपलब्ध करून न देण्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे रखडगाणे नव्या कुलगुरूंच्या कार्यकाळातही मागील पानापासून पुढे सुरूच आहे.
परीक्षा होऊन सात महिने लोटले तरी परीक्षा विभागाने शेकडो विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केलेले नाहीत. तसेच ज्यांचे निकाल जाहीर केले आहेत त्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे, पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे एक वर्ष हकनाक वाया गेले आहे.
विद्यापीठाची बी.एस्सी.ची परीक्षा एप्रिल, २०१५मध्ये झाली. त्याचा निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आला. या परीक्षेच्या निकालाबाबत ज्यांना शंका होत्या त्या विद्यार्थ्यांनी लगेचच पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज केले. मात्र, अनेकांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. ज्यांचे ऑनलाइन जाहीर केले आहेत त्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यापैकी काही विद्यार्थ्यांनी तर आता कुलगुरूंनाच पत्र लिहून साकडे घातले आहे.
‘पुनर्मूल्यांकनाकरिता प्रत्येक विषयाकरिता ५०० रुपये घेतले जातात. पण, इतके शुल्क भरूनही जर वेळेत निकाल हाती पडत नसेल तर काय फायदा,’ असा सवाल रुपारेल महाविद्यालयाच्या प्रशांत गवस या विद्यार्थ्यांने केला. एकटय़ा रुपारेलच्या १५ ते १६ बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाकरिता अर्ज केले आहेत. परंतु, या सर्वाना निकालाअभावी पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आलेला नाही.
मुळात पुनर्मूल्यांकनातच इतकी दिरंगाई झाली आहे की विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राला प्रवेश मिळालेला नाही. त्यात ज्यांचे निकाल जाहीर केले आहेत त्यांना गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक अशा महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना गुणपत्रिकेकरिता रखडविणे हा त्यांच्या भवितव्याशी खेळ नाही का, असा सवाल प्रशांत याने उद्विग्नपणे केला आहे. ‘केवळ बी.एस्सी.च्या याच नव्हे तर २०१४ ला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्याही पुनर्मूल्यांकनाच्या गुणपत्रिका विद्यापीठाने अद्याप दिलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या काहीच चूक नसताना विद्यापीठाच्या बेजबाबदार कारभारामुळे त्यांना एका वर्षांवर पाणी सोडावे लागले आहे,’ अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी व्यक्त केली.

गुणांची वाढ २०वरून ६०वर
पुनर्मूल्यांकनात गुणांमध्ये होणारे बदल पाहून काही विद्यार्थ्यांना तर तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. बी.एस्सी.च्या एका विद्यार्थ्यांचे गुण २० वरून तडक ६० इतके झाले आहेत. ‘तब्बल ४० गुणांच्या या फरकाने सर्वच अवाक झाले. परंतु, मला माझ्या निकालाविषयी विश्वास होता. इतके कमी गुण मिळणे शक्यच नसल्याने मी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. परंतु, माझी काहीच चूक नसताना विनाकारण ५०० रुपयांचा भरुदड मला सहन करावा लागला. शिवाय माझा निकाल मला मिळालेला नाहीच,’ अशा शब्दांत एका विद्यार्थ्यांने आपली हतबलता व्यक्त केली.