मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची हेलिकॉप्टरमधून भ्रमंती

‘‘बालपणी वेंगुल्र्यात खेळताना कधी विमान दिसले की नेहमी वाटायचं एकदा तरी एकदा विमानात बसावं पण, हेलिकॉप्टरमध्ये बसू असं कधीच वाटलं नव्हतं. पुढे मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळाला. विद्यापीठाच्या कालिना संकुलात सतत विमान आणि हेलिकॉप्टरचे आवाज येतात. पण, आज अचानक हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा अनुभवही मिळाला. मुंबई दर्शनाचा हा अनुभव अवर्णनीय होता’’, अशा शब्दांत विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात शिकत असलेल्या स्नेहल जाधव हिने हेलिकॉप्टर सहलीचा आनंद व्यक्त केला.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

असाच काहीसा अनुभव इतिहास विभागात शिकत असलेल्या मूळच्या नागपूरच्या पायल भट्टड या विद्यार्थिनीचा आहे. ‘भविष्यात विमान प्रवास करू; मात्र या पहिल्या हवाई प्रवासाची आठवण कधी विसरू शकणार नाही,’ अशा शब्दांत पायलने  मुंबईच्या हवाई दर्शनाच्या आनंद व्यक्त केला. स्नेहल आणि पायल यांच्याप्रमाणे विद्यापीठाच्या कालिना संकुलातील हेलिपॅडवरून १४ विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी आकाशभरारी घेतली आणि मुंबईचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविले. हवाईक्षेत्रातील करिअरविषयक संधी लक्षात घेऊन बीएस्सी एरॉनॉटिक्स आणि एअरक्राफ्ट मेंटेनेंस अभियांत्रिकी हा द्वीपदवी  अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येत आहे. त्या करिता विद्यापीठाने अलीकडेच ‘पवन हंस लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला. या करारानुसार पवन हंसच्या वतीने विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दहा टक्के तर विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५ टक्के सवलतीत सफर घडविली जाणार आहे.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]