पाचवी-सहावी मार्गिका, हार्बर विस्तार प्रकल्प अजूनही रखडलेलेच; मुदतीत काम होणे कठीण

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लाखो मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई नागरी वाहतूक योजनेच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन महत्त्वाचे प्रकल्प रखडलेल्या अवस्थेतच आहेत. विशेष म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते एमयूटीपी-३मधील अनेक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वाला येण्याची दाट शक्यता असली, तरी दुसऱ्या टप्प्यातील काही प्रकल्पांच्या पूर्ततेबद्दल ठोस सांगता येत नाही. त्यामुळे एमयूटीपी-३ पूर्ण झाला, तरी दुसऱ्या टप्प्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एमयूटीपी-२ या योजनेतील सीएसटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका, ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका आणि अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार हे तीन महत्वाचे प्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. या तीनही प्रकल्पांसाठी अनुक्रमे डिसेंबर २०१९, डिसेंबर २०१७ आणि मार्च २०१७ अशी कालमर्यादा ठेवली आहे. यापैकी अंधेरी-गोरेगाव यांदरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार हा प्रकल्प वगळता इतर दोनही प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नसल्याचे रेल्वेचे अधिकारीच खासगीत सांगतात.

अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार हा प्रकल्प जोगेश्वरी येथील एका दारूच्या गुत्त्यामुळे रखडला असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. मात्र आता हे प्रकरण रेल्वेसाठी डोकेदुखीचे उरले नसून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक निर्णय झाल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प मार्च २०१७मध्ये पूर्ण होईल, अशी खात्रीही त्याने व्यक्त केली.

सीएसटी-कुर्ला यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेतील परळ टर्मिनसपर्यंतच्या टप्प्याचे काम सुरू झाल्याचे मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पण ही कामे अद्याप प्राथमिक टप्प्यात असून हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर परळ ते सँडहर्स्ट रोड हा आव्हानात्मक टप्पा असून त्यासाठी परळ, करीरोड, चिंचपोकळी आणि भायखळा येथील उड्डाणपुलांचा निकाल लावावा लागेल. हे काम किती काळ चालेल, हे अद्याप निश्चित नाही. कागदोपत्री हा प्रकल्प २०१९मध्ये पूर्ण होणार असला, तरी प्रत्यक्षात त्यासाठी किती काळ लागेल, याचा अंदाज आत्ताच बांधणे शक्य नसल्याचेही रेल्वे अधिकारी सांगतात.

त्याप्रमाणे ठाणे-दिवा यांदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प बरोबर एक वर्षांने डिसेंबर २०१७मध्ये पूर्ण होईल, असे एमआरव्हीसी सांगत आहे.

मुंब्रा येथे उड्डाणपूल बांधण्यापासून ठाणे-दिवा यांदरम्यान आठ ते नऊ कट-कनेक्शनचे महामेगा ब्लॉक आदी महत्त्वाच्या गोष्टी एका वर्षांच्या आत पूर्ण होणे वास्तववादी नसल्याचे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यातच एमयूटीपी-३मधील कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या प्रकल्पाची सांगड पाचव्या-सहाव्या मार्गिकेसह घातली जाणार असल्याने हा प्रकल्प लांबण्याची शक्यता आहे.

याउलट एमयूटीपी-३मधील दोन महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करणे रेल्वेच्या दृष्टीने सोपे आहे. विरार-डहाणू यांदरम्यान चौपदरीकरणासाठी जागा आणि कामासाठी उपलब्ध वेळेची वानवा नसल्याने हे काम २०२०-२१पर्यंत पूर्ण होणे शक्य आहे. त्याचप्रमाणे पनवेल-कर्जत यांदरम्यान दुसरी मार्गिका टाकण्यासाठीही रेल्वेकडे जागा उपलब्ध असून या मार्गावर रेल्वे वाहतूक कमी असल्याने कामासाठीचा वेळ जास्त आहे. परिणामी या मार्गावरील कामही विहित वेळेत पूर्ण होणे शक्य आहे. मात्र, कळवा-ऐरोली यांदरम्यानच्या उन्नत जोडमार्गाचे काम येथील लोकवस्तीमुळे रेंगाळण्याची शक्यता रेल्वे अधिकारी बोलून दाखवतात.