मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात वरुण राजाने तळ ठोकला असून तलावांमधील साठय़ात सुधारणा होऊ लागली आहे. परिणामी मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट आता दूर होण्याची चिन्हे आहेत.
जून- जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने तलावक्षेत्रांकडे पाठ फिरविली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तलावक्षेत्रात पावसाने जोर धरला असून तलावांतील पाण्याचा साठा २,५१,९२० दशलक्ष लिटरवर गेला आहे. मात्र गेल्या वर्षी जून आणि जुलैमध्ये मुबलक पाऊस झाल्याने या कालावधीत तवालक्षेत्रात १० लाख दशलक्ष लिटरहून अधिक पाणी होते.
सोमवारी सकाळी ६ पूर्वी २४ तासांमध्ये मोडकसागर क्षेत्रात ८४.२० मि.मी., तानसा क्षेत्रात ७१.६० मि.मी., अप्पर वैतरणा ३० मि.मी., भातसा ३२ मि.मी., तर मध्य वैतरणा क्षेत्रात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे मोडकसागरमध्ये ७६,६०५, तानसामध्ये २७,६७४ , अप्पर वैतरणात ६,६६०, भातसात १,०२,२९५, मध्य वैतरणामध्ये २३,६७६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.