मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असून जलसाठय़ामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत  तलाव निम्म्याने भरले असून तलावातील जलसाठा ६,७५,१२३ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे आहेत.
mum877मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. जूनमध्ये दमदार हजेरी लावून पाऊस गायब झाल्यामुळे पालिकेच्या जल विभागातील अधिकारी चिंतीत झाले होते. निम्मा जुलै महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची चिन्हे होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला. जुलैमध्ये पुनरागमन करीत दमदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे तलावांमधील साठय़ात चार लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. मुंबईकरांना १८० दिवस पुरेल इतके पाणी सध्या तलावांमध्ये उपलब्ध झाले आहे.
गेले काही दिवस तलावांच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून रविवारी दिवसभरात मोडकसागरमध्ये १२५ मि.मी., तानसामध्ये ६६.४० मि.मी., विहारमध्ये ३६.६० मि.मी., तुळशीमध्ये ४२ मि.मी., अप्पर वैतरणामध्ये १२५ मि.मी., भातसामध्ये ८० मि.मी. आणि मध्य वैतरणामध्ये १३८.२० मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून तलावांतील साठा ६,७५,१२३ दशलक्ष लिटरवर पोहोचला. गेल्या वर्षी याच दिवशी ३,७३,२४४ दशलक्ष लिटर इतके पाणी तलावांमध्ये होते. वर्षभर मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे तलावातील साठा सुमारे सात लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे.