गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा, त्याच्या बनावट लेडरहेडचा गैरवापर करुन त्यांच्या नावावर अनेकांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळणाऱ्या रेवती खरे या महिलेचा गावदेवी पोलीस शोध घेत आहेत. या महिलेने लता मंगेशकर यांची स्वीय सहायय्क तसेच निकटवर्तीय असल्याचे भासवून सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून अनेकांना गंडा घातला असल्याची बाब उघड झाली आहे.

पुस्तक प्रकाशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना ही महिला उपस्थित राहात असे. लता मंगेशकर यांनी सामाजिक काम सुरु केले असून त्यांचे लेटरहेड ती उपस्थिताना दाखवून त्यांच्या नावावर देणगी घेण्याचे काम करत होती. देणगी देणाऱ्या एका व्यक्तीने ही बाब काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या कानावर घातली आणि हा प्रकार उघडकीस आला. मंगेशकर यांच्यावतीने महेश राठोड यांनी या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुस्तक प्रकाशकांकडेही पैशांची मागणी

या प्रकरणी रेवती खरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध घेण्यात येत आहे. खरे हिने ज्यांना फसविले आहे त्यापैकी दोन ते तीन जणांची नावे मिळाली आहेत. मात्र त्या व्यक्ती बाहेरगावी गेल्या आहेत किंवा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. या महिलेने लता मंगेशकर यांचे नाव वापरून काही पुस्तक प्रकाशकांकडेही पैशांची मागणी केली असल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.