रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान ठाणे महापालिकेची ऐतिहासिक कारवाई

ठाणे जिल्ह्य़ातील संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा परिसरात ठाणे महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत बुधवारी दिवसभरात सुमारे १४०० बेकायदा बांधकामे तसेच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिकेने आखलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून सुमारे ५०० हून अधिक पोलीस-महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या फौजफाटय़ासह ही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असून मुंब्य्रात रस्ते, पदपथ, नाल्यांवर वर्षांनुवर्षे ठाण मांडलेल्या बेकायदा बांधकामधारकांची गाळण उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी बेकायदा बांधकामे पाडली जात आहेत. ठाण्यापाठोपाठ कळव्यातही कारवाई केली जात होती. मात्र, मुंब्य्रात कारवाई करण्याची प्रशासनात धमक नाही, अशी टीका सुरू होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर या कारवाईचे संकेत मिळू लागले होते.

बुधवारी सकाळी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोठय़ा बंदोबस्तासह मुंब्य्रात हजेरी लावली. ते मुंब्य्रात काही तास तळ ठोकून होते. कळवा-मुंब्रा विभागाचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब हेदेखील सहभागी होते.

सात ठिकाणे, नऊ तास

  • एकाचवेळी सात ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात नऊ तास कारवाई.
  • मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूस असलेली सुमारे १४०० बांधकामे, अतिक्रमणे, टपऱ्या जमीनदोस्त.
  • १८२ पत्र्यांचे गाळे, १५८ पक्के बांधलेले गाळे, १८२ टपऱ्या, ४५६ शेड्स, ६८ चायनीज व चिकनचे गाळे, ६४ गॅरेज, ८० चहाच्या टपऱ्या, चार लाकडाच्या वखारी, दोन कंटेनरमध्ये सुरू असलेली बेकायदा दुकाने पाडली.
  • एका कंटेनरमध्ये बेकायदा दवाखाना चालविण्यात येत असल्याचे उघड.