केंद्रीय कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांबरोबर रिक्षाचालक व फेरीवालेही सहभागी होणार आहेत.
मानसेवी कामगारांसह सर्व प्रकारच्या कामगारांना १० हजार रुपये किमान वेतन द्यावे, कामगार कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, कामगार संघटना स्थापन करण्यास व संघटना विशिष्ट कालावधीत नोंदणी करून मिळण्याचा अधिकार कामगारांना द्यावा, सर्व आस्थापनांमध्ये कामगार संघटनांना मान्यता मिळावी, सर्व कामगारांचा कामाचा कालावधी आठ तास असावा, सर्व कंत्राटी कामगारांना ‘समान कामाला समान दाम’ द्यावा, आदी विविध मागण्यांसाठी सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय हिंद मजदूर सभेने मंगळवारी घेतला. हिंद मजदूर सभेशी संलग्न सर्व संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
जकात रद्द करू नये, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीची री ओढत हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शरद राव यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली. इंधनावरील अनुदानात कपात केल्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या बेस्टसमोर नवे संकट उभे राहिले आहे. बेस्टला वाचविण्यासाठी उपक्रमातील कर्मचाऱ्यांनाही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शरद राव यांनी केले. रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांच्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे ‘भारत बंद’मध्ये त्यांनीही सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शरद राव यांनी दिली.
दरम्यान, रिक्षा चालकांना एक लाख नवीन परवाने अदा करावेत, रिक्षा-टॅक्सी चालकांना भविष्य निर्वाह निधी, उपदान, निवृत्ती वतन, वैद्यकीय सुविधा आदी योजना लागू करावी, सक्तीच्या विम्यामधून बेस्ट उपक्रमाप्रमाणे रिक्षा चालकांना सूट द्यावी, आदी मागण्यांसाठी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनतर्फे १४ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत.