सोडतीद्वारे बदली केल्याने कर्मचारी संतप्त; पालिका मुख्यालयावर मोर्चा

कोणतेही निकष विचारात न घेता करनिर्धारण आणि संकलन, तसेच जकात विभागातील सुमारे ५३१ कर्मचाऱ्यांची सोडत पद्धतीने बदली करण्यात आल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून या विभागांतील तब्बल २४०० कर्मचाऱ्यांनी बुधवारी नैमित्तिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी १२ वाजता या कर्मचाऱ्यांचा पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू केली असून त्यानंतर जकात कर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या जकात विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालिकेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचबरोबर करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षाही घेण्याचे प्रशासनाने ठरविले होते. निवृत्तीच्या जवळ पोहोचल्यानंतरही बदलीसाठी परीक्षा द्यावी लागणार या विचाराने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला होता.

प्रशासनाने सोमवारी सोडत पद्धतीने काढलेले बदलीचे आदेश या दोन्ही विभागांतील सुमारे ५३१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे पाठविले. मात्र या मंडळींनी हे आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. कोणतेही निकष न लावता केवळ सोडत पद्धतीने बदली करण्यात येत असल्याने संतापलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे सर्व अधिकारी-कर्मचारी बुधवारी एक दिवसाची नैमित्तिक सुट्टी घेऊन आंदोलन करणार आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी १२ वाजता या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बदली निकषांना केराची टोपली

म्युनिसिपल मजदूर युनियनने या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी काही निकष पालिका प्रशासनाला सादर केले होते. मात्र या निकषांना प्रशासनाने कचऱ्याची टोपली दाखविली. दरम्यानच्या काळात या दोन्ही विभागांतील २४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोडत पद्धतीने बदली करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियनने न्यायालयात धाव घेतली आहे.