क्रिकेट हा भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ. श्रीमंती क्लबपासून शहरातील गल्लीबोळातून हा खेळ तेवढय़ाच आक्रमकतेने खेळला जातो. करोडो देशवासीयांचे डोळे लागलेल्या क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय मदानावर कधीतरी आपणही बॅट फिरवावी, असे स्वप्न डोळ्यात असलेल्या महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दुबईच्या मदानावर इतर देशांच्या संघासोबत खेळण्याची संधी मिळत आहे. २ ते ४ डिसेंबरदरम्यान भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, केनिया आणि संयुक्त अरब अमिरात या सात देशातील विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होत आहेत. यासाठी सलाम फाऊंडेशनकडून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा खर्च उचलण्यात आला आहे.
इंग्लडचा माजी कप्तान केविन पीटरसनच्या संस्थेकडून दुबई येथे १९ वर्षांखालील गटात ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चमक दाखवता यावी यासाठी २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान दुबई येथे केविन पीटरसनकडून एका आठवडय़ाचे विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. पालिकेच्या १२ विद्यार्थ्यांच्या संघाचे नेतृत्व मालाड येथील एरंगळ महापालिका शाळेचा सुमित कंदारी करत आहे. भायखळा मनपा शाळेतील अकिब अन्सारी, न्यू माहीम शाळेचा गौतम पवार, एलिफिन्स्टनच्या ग्लोब मिल शाळेचे अली हसन, संदीप सिंह, सिद्धार्थ जैसवाल, एरंगळ शाळेचे रोहित बोधनकर, रवी मल्ला, भायखळा शाळेचे मंदार पुरालकर, अविनाश बारगुडे, ताडदेव मनपा शाळेचा अमर भाइंदे, आर. आर. पी. मनपा शाळेचा पंकज पटेल या संघात आहेत.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने २००५ पासून क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या क्रिकेट स्पध्रेमध्ये महापालिकेच्या विविध शाळांमधील ६० संघ सहभागी झाले होते. यामध्ये ४८ संघ हे मुलांचे होते, तर १२ संघ हे मुलींचे होते. सहावीच्या मुलांसाठी आयोजित होणाऱ्या क्रिकेट स्पध्रेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ते सातवीमध्ये गेल्यावर क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यानंतर याच मुलांमधून निवड केलेल्या मुलांना ते आठवीत व नववीत असताना आधुनिक साधनांसह प्रशिक्षण दिले जाते. हा संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील गटातील ‘लिटिल मास्टर्स चॅलेंज’ या क्रिकेट स्पध्रेमध्ये सहभागी होतो. या क्रिकेट स्पध्रेत मुंबईतील खासगी शाळांचे संघदेखील सहभागी होत असतात. विशेष म्हणजे सन २०११-१२ व सन २०१२-१३ अशी सलग दोन वष्रे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावले आहे. सन २०१२-१३मध्ये महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या चमूचे नेतृत्व करणारा सुमित कंदारी हाच दुबई येथे जाणाऱ्याही चमूचे नेतृत्व करीत आहे.