प्रभादेवीतील विधि महाविद्यालयाच्या तरुणाला अटक; गावदेवी पोलिसांची कामगिरी
सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. मैत्रीनंतर त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागले, मग तिचे लक्ष वेधण्यासाठी तो वाट्टेल ते करू लागला, पण तरीही मुलगी प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर मग त्याने वेगळाच मार्ग पत्करला. तिने होकार दिला तर जिवंत ठेवायचे, नकार दिला तर मारून टाकायचे. ही कथा कुठल्या चित्रपटाची नाही तर मुंबईत घडलेली घटना आहे.
प्रभादेवीच्या विधि महाविद्यालयात कृणाल देसाईने जून २०१५ मध्ये विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. १२वी वाणिज्य शाखेत ८४ टक्के मिळविणाऱ्या कृणालची ओळख १७ वर्षीय अंजनाशी (नाव बदलले आहे) झाली. कृणालला अंजना आवडू लागली. मग कधी श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगून तो मित्रांसह तिला घेऊन घरी आला, तर कधी तुझ्या आठवणीमुळे रक्तदाब वाढून रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगू लागला. अंजनाला कृणालचा खोटारडेपणा कळल्यानंतर तिने त्याच्याशी पूर्ण संबंध तोडून टाकले. पण तरीही कृणाल तिला भेटण्यासाठी-बोलण्यासाठी आर्जवे करत होता. अखेर मार्च २०१६ मध्ये अंजनाला आपलेसे करण्याचा काहीच मार्ग शिल्लक नसल्याचे पाहून त्याने एक कट रचला. १८-१९ एप्रिलला ग्रँट रोडजवळचे एक चारतारांकित हॉटेलमधील रूम त्याने बुक केली. त्यानंतर अंजनाशी त्याने सोमवार, १८ एप्रिलला संपर्क साधला. माझ्याकडे तुझे काही फेरफार केलेले खासगी छायाचित्र-चित्रफिती आहेत, तू मला भेटली नाहीस तर ते समाजमाध्यमांमधून प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. भेदरलेली अंजना आपल्या एका मैत्रिणीला घेऊन मंगळवारी ग्रँट रोडच्या नाना चौकात आली. तेव्हा कृणालने तिला हॉटेलमधील आठव्या माळ्यावर येण्यास सांगितले. अंजना तिथेही मैत्रिणीला सोबत घेऊन गेली. रूममध्ये तिघेही बसले असता कृणालने पुन्हा तिच्याकडे प्रेमभावना व्यक्त केली. मात्र अंजनाने साफ नकार देत छायाचित्र दाखविण्याची मागणी केली. अध्र्या तासाच्या वादावादीनंतर कृणालने अंजनाच्या मैत्रिणीला ‘आम्हाला खासगी बोलायचे आहे’, असे सांगून बाहेर जाण्यास सांगितले. मैत्रीण बाहेर गेल्यानंतर कृणालने पुन्हा तिच्याशी वाद घातला, पण अंजना ऐकतच नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला अंजनाने जोरदार प्रतिकार केला. मग अखेरचा उपाय म्हणून कृणालने सोबत आणलेल्या रश्शीने तिचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृणालने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, मोबाइलवर चॅटिंग करत बसलेल्या मैत्रिणीला तब्बल अर्धा तासानंतर हा प्रकार समजला. तिने तातडीने गावदेवी पोलिसांना हा प्रकार कळवला. कृणालचे सर्व नातेवाईक गुजरातला असल्याचे कळल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताजी भोपळे यांनी तातडीने पथकाची निर्मिती केली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी कांबळे यांच्या पथकाने कृणालला बडोद्यातून ताब्यात घेतले.