मालमत्तेच्या वादातून झालेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिसऱ्या व्यक्तीचा वर्मी मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना साकीनाका येथे घडली. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. साकीनाका येथील जंगलेश्वर महादेव मंदिर रोड येथे मोहम्मद हुसेन अब्दुल मलिक मनिहार (३८) यांचे लाकडाचे दुकान आहे. सोमवारी रात्री मनिहार यांच्यावर आरोपी मोहम्मद अली टेलर याने साथीदारांसह हल्ला चढवला. मनिहार यांना वाचविण्यासाठी शेजारीच राहणारे त्यांचे चुलत भाऊ यासिन मनिहार आणि त्यांचे कुटुंबीय मध्ये पडले. यावेळी हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या यासिन मनिहार (५०) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ मोहम्मद मनिहार गंभीर जखमी झाले. मयत यासिन यांची पत्नी आणि मुलीही हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून मोहम्मद महमूद अली उर्फ टेलर, अकरम आणि शहानवाज टेलर या तिघांना अटक करण्यात आली आहे.