विश्वरुप मुंबईतही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढली नाहीत, तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला आहे.
मुंबईमध्ये आजपासून हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. मात्र, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात आलेली नसल्याचे वितरकांनी सांगितले. तमिळनाडू सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्यावरून देशभर हा विषय चर्चेत आला. उत्तर प्रदेश सरकारही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. प्रदर्शनावरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे अभिनेता कमल हासन यांने गुरुवारी स्पष्ट केले होते.
विश्वरुपमध्ये काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याचे आम्हाला समजले आहे. प्रदर्शनापूर्वी ही दृश्ये वगळली नाहीत, तर उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करू, असे मौलाना बुऱहानुद्दीन काझमी यांनी म्हंटले आहे. हा चित्रपट अद्याप मी पाहिलेला नाही. पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दृश्ये असल्याचे मला समजले आहे, असे काझमी यांनी सांगितले.
मुळच्या विश्वरुपममधील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यास कमल हासन याने होकार दिला आहे. मात्र, याच चित्रपटाचे हिंदी रुपांतर असलेल्या विश्वरुपमधील आक्षेपार्ह दृश्ये काढण्याबद्दल त्याने अजून कोणतेही वक्तव्य केलेले नाही.