भारत आणि अमेरिकेमध्ये रखडलेला अणुकरार पुन्हा एकदा मार्गस्थ होण्याच्या दिशेने दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असतानाच, कोकणातील जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला विरोध कायमच राहणार आहे. शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. मात्र, जैतापूरमधील नागरिकांचा अणुप्रकल्पाला विरोध असल्यामुळे शिवसेना त्यांच्यासोबत राहणार असल्याचे पक्षाच्या कोकणातील एका नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात असल्याचे जाहीर सभांमधूनच सांगण्यात आले होते. जैतापूरजवळच्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. हा प्रकल्प त्यांना धोकादायक वाटतो. शिवसेना केवळ त्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्त्व करीत आहे. या भागातील जास्तीत जास्त लोक या प्रकल्पाला पाठिंबा देणार नाहीत, तोपर्यंत शिवसेना त्याला विरोधच करेल, असे या नेत्याने स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे सांगत कोकण बचाव समिती आणि जनहित सेवा समिती यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. प्रत्यक्षात आल्यास जैतापूर प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा अणुप्रकल्प ठरणार आहे.