महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभरात प्रवास करून प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संत नामदेव यांच्या जीवनकार्याची महती आजच्या पिढीसमोर यावी, यासाठी मुंबई विद्यापीठ नाटय़ कला अकादमी आणि डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १ आणि २ मार्च रोजी ‘नामाचिये द्वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटय़ कला अकादमीचे प्रमुख प्रा. वामन केंद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विविधरंगी कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात रंगणार आहे.
भजन, अभंग, भारूड, नामसंकीर्तन अशा विविध प्रकारांमध्ये संत नामदेव यांनी केलेल्या रचना जीवनाचे सार सांगतात. त्यांच्या याच विविध भाषिक रचना गायनाची स्पर्धा १ मार्च रोजी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी आहे. दुसऱ्या टप्प्यात संत नामदेव यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘वारकरी संप्रदाय व संत नामदेव’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे, ‘संत नामदेव – व्यक्तित्त्व आणि कवीत्त्व’ या विषयावर डॉ. यु. म. पठाण आणि ‘संत नामदेव यांचे उत्तर भारतातील कार्य आणि उत्तर भारत’ या विषयावर डॉ. अशोक कामत या व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विद्यानगरीच्या मुक्ताकाश रंगमंच येथे संत नामदेव यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा कार्यक्रम होईल. यात अजित कडकडे यांचे गायन, लोककलावंत गोदावरी मुंडे यांचे भजन, कुलदीप सिंग यांचे मुखवाणी गायन आणि लोककलावंताचे भारूड सादरीकरण यांचा समावेश असेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असणार आहे.