उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

हिंदू देवतांची नावे ही कोणाची मक्तेदारी नाही वा व्यापारचिन्ह म्हणूनही त्यावर कुणाला तसा दावा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रोडक्ट प्रा. लि.’ आणि ‘जीईबीआय प्रॉडक्ट्स’ या कंपन्यांमध्ये झाडूच्या ‘लक्ष्मी’ आणि ‘महालक्ष्मी’ नावावरून वाद सुरू होता. मात्र हिंदू देवतांची नावे ही कुणाची मक्तेदारी नाही किंवा कुणी त्यावर आपला दावाही सांगू शकत नाही, हा ‘जीईबीआय प्रॉडक्ट्स’चा दावा न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने मान्य करीत ‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि.’चा दावा फेटाळून लावला. ‘लेबल मार्क’वर दावा करणे व त्याचे संरक्षण करणे आणि एखाद्या सर्वसामान्य नावावर मक्तेदारी करणे या दोन बाबी वेगळ्या आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि.’ ही कंपनी घरगुती वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करते. शिवाय औद्योगिक क्षेत्रातील स्वच्छतेच्या वस्तूंचेही उत्पादन करते. त्यात झाडू, ब्रश आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु ‘जीईबीआय’ या कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव हेतुत: वापरल्याचा आरोप करीत ‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि.’ने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता व ‘जीईबीआय’ला उत्पादनासाठी नावाचा वापर करण्यापासून मज्जाव करण्याची विनंती केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर कंपनीने खंडपीठासमोर अपील केले होते.

‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि.’च्या दाव्यानुसार, १९९५ सालापासून कंपनी  ‘लक्ष्मी’ या नावाने झाडूच्या उत्पादनाची विक्री करीत आहे. २००३ मध्ये त्याच नावाने या उत्पादनाची नोंदणीही करण्यात आली. २०१५ मध्ये ‘जीईबीआय’ या कंपनीने झाडूच्या उत्पादनाची विक्री सुरू केली आणि त्यासाठी ‘महालक्ष्मी’ या नावाचा वापर करण्यात आला. कंपनीने हेतुत: हे नाव आपल्या उत्पादनासाठी आत्मसात केले आणि त्याचा वापर केला, असा आरोप केला होता. परंतु हिंदू धर्मीयांमध्ये ‘लक्ष्मी’ हे सर्वसामान्य नाव आहे. त्यावर कुणाचा विशेषाधिकार नाही. त्यामुळे अशा नावांवर कुणाला मक्तेदारी गाजवण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा दावा प्रत्युत्तरादाखल ‘जीईबीआय’कडून करण्यात आला होता. न्यायालयाने कंपनीचे हे म्हणणे मान्य केले आणि ‘फ्रुडेनबर्ग गाला हाऊसहोल्ड प्रॉडक्ट प्रा. लि.’चे अपील फेटाळून लावले.

  • दोन्ही कंपन्यांनी उत्पादनासाठी वापरलेल्या नावांमध्ये वेगळेपण असल्याने ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • ‘लक्ष्मी’ आणि ‘महालक्ष्मी’ या दोन्ही नावांमध्ये काहीच साम्य नाही; किंबहुना ती वेगळी आहेत.
  • ‘लक्ष्मी’ हे नाव त्रिमिती टंक वापरून, तर ‘महालक्ष्मी’ हे नाव साधे टंक वापरून लिहिण्यात आलेले आहे.
  • ‘लक्ष्मी’ हे नाव गडद निळ्या, तर ‘महालक्ष्मी’ हे नाव लाल रंगात लिहिण्यात आलेले आहे.