मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना नेतृत्वाला प्रत्युत्तर

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दणकेबाज विजयानंतर, शिवसेनेने भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. भाजपचा हा परतीचा प्रवास असल्याची टीका करण्यात आली. मात्र, नांदेडमध्ये भाजप नव्हे, शिवसेनाच भुईसपाट झाली, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचा टोलाही त्यांनी सेना नेतृत्वाला लगावला.

राज्यात या वर्षांच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठी आघाडी घेतली. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा सुसाट सुटलेला वारू काँग्रेसने रोखला. नांदेड पालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम अशी पंचरंगी लढत झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपली सारी राजकीय ताकद पणाला लावली होती. अखेर काँग्रेसनेच बाजी मारली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम यांचा दारुण पराभव झाला. अर्थात विजय झाला काँग्रेसचा, परंतु, शिवसेनेने भाजपवरच शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या सुरात सूर मिसळत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा हा परतीचा प्रवास सुरू झाल्याची टीका केली होती.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना, नांदेड महापालिका निकालाचे नीट विश्लेषण करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला शिवसेनेला दिला. मुळात नांदेडमध्ये भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते. भाजप पाचव्या स्थानावर होता. मागील निवडणुकीत भाजपला तीन टक्के मते मिळाली होती.

या निवडणुकीत २५ टक्क्यावर मतांचा आलेख गेला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेची मते १८ टक्क्यावरून ६ टक्क्यापर्यंत खाली घसरली. राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षांची मतेही कमी झाली आहेत. काँग्रेसला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी, त्यांची ३८ वरून ४६ टक्के मते वाढली आहेत, म्हणजे त्यांना आठ टक्क्यांचा लाभ झाला. भाजपची मते मात्र २२ टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे हा भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचा पराभव आहे, असा पलटवार त्यांनी केला.

शिवसेनेचे दोन पक्षप्रमुख

मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना ही काँग्रेसची ‘ब टीम’ असल्याचा आरोप केला होता. त्याचा पुनरुच्चार करीत, शिवसेनेला दोन पक्षप्रमुख आहेत, एक राज्याचे प्रमुख आणि दुसरे, नांदेडमधील शिवसेनेचे प्रमुख अशोक चव्हाण आहेत, असा टोला त्यांनी सेना नेतृत्वाला लगावला.