रालोआतील पाहुण्याचा घरचा आहेर’!

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत झालेली भाजपच्या दारुण पराभवाची नामुष्की पाहता, भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रचार करूनही इतक्या कमी जागा मिळाल्या याचा विचार सगळ्याच भाजप नेत्यांनी केला पाहिजे, असा ‘घरचा आहेर’ देऊन रालोआमध्ये नव्यानेच सामील झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपली नाराजीही नोंदविली.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक होते. मात्र, दीर्घ प्रतीक्षेनंतरही पक्षप्रवेश न झाल्याने त्यांना स्वतचा पक्ष स्थापन करून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दाखल व्हावे लागले. शिवाय, त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुद्दादेखील अद्याप टांगणीवरच आहे. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी भाजपला दिलेला आत्मपरीक्षणाचा सल्ला म्हणजे त्यांच्या नाराजीचा पहिला सूर असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसमध्ये असताना राणे आणि अशोक चव्हाण यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. अशोक चव्हाण यांच्यावर टीका करूनच राणे यांनी पक्षाला रामराम केला होता. अशोक चव्हाण यांचे संपूर्ण वर्चस्व असलेल्या नांदेड महापालिका निवडणुकीतील निकाल ही भाजपची नामुष्की असल्याचे रोखठोक मत राणे यांनी व्यक्त केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राणे यांनी शिवसेनेवरही नेम साधला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी या निवडणूक प्रचारात जी भाषा वापरली, तर त्यांचीही एक-दोन जागांवरच मतदारांनी बोळवण केली. त्यामुळे त्यांनीही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नांदेडचा विजय ही आगामी निवडणुकांची चुणूक आहे, येत्या दोन वर्षांत राज्यातील चित्र पालटेल असे मानणे योग्य नाही, असेही राणे म्हणाले. नांदेडला कशा प्रकारे निवडणुका होतात, महापालिकेच्या निवडणुका कशा झाल्या, चव्हाण यांच्या पत्नीचा विजय कसा झाला, यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. पण नांदेडच्या निकालांची तुलना करून कोणतेही निष्कर्ष काढता येणार नाहीत, असा टोलाही राणे यांनी मारला.