उर्दू भाषेवरील प्रेम चित्रपटातील गीतलेखनातून समाजापर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध कवी आणि गीतकार नक्श लायलपुरी यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, सून असा परिवार आहे. रविवारी संध्याकाळी ओशिवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब येथील लायलपूर (सध्या पाकिस्तानात) गावात २४ फेब्रुवारी १९२७ रोजी नक्श लायलपुरी यांचा जन्म झाला. गावावरील प्रेमासाठी त्यांनी स्वत:चे जसवंत राय शर्मा नाव बदलून नक्श लायलपुरी केले होते. शालेय जीवनात त्यांचे उर्दू भाषेवरील प्रभुत्व पाहून शिक्षक आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी लाहोरला उर्दूचे पुढील शिक्षण घेतले. १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते कुटुंबासोबत लखनौला आले. मात्र चित्रपटाचे वेध लागलेले लायलपुरी काही वर्षांत मुंबईत दाखल झाले. काही वर्षे त्यांनी पोस्टात काम केले. मात्र, मित्रांच्या आग्रहाखातर एका नाटकाचे लिखाण केले. त्या दरम्यान त्यांची आणि जगदीश सेठी यांची ‘जग्गु’ (१९५२) चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान भेट झाली आणि लायलपुरी यांना चित्रपट गीत लिहिण्याची पहिली संधी गवसली.

‘दो दिवाने शहर मे’

‘घमंड’ (१९५५), ‘रायफल गर्ल’ (१९५८), ‘सर्कस क्वीन’ (१९५९), ‘चोरो की बारात’ (१९६०), ‘चेतना’ (१९७०), ‘दिल की राहे’ (१९७३), ‘कॉलगर्ल’ (१९७४) या चित्रपटांची गीतरचना लायलपुरी यांनी केली. यातील प्रामुख्याने ‘मै तो हर मोड पर दुंगा सदा’ हे मुकेश यांनी गायलेले गाणे, ‘रस्म-ए-उल्फत को निभाये तो निभाये कैसे’, ‘उल्फत मे जमाने की’, ‘दो दिवाने शहर मे’ ही गाणी आजही चाहते आवडीने गुणगुणतात. हिंदी चित्रपटांबरोबरच ४० पंजाबी चित्रपटांसाठी ३५० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत.