‘मिलिंद नार्वेकर हा उद्धव ठाकरे यांचा घरगडी’ अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर केली होती. त्याच नार्वेकर यांनी शिवसेनेत परत यावे म्हणून प्रस्ताव दिला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला. नार्वेकर यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या राणे यांनी नार्वेकर यांच्याशी संवाद साधलाच कसा,  असा सवाल शिवसेनेतून केला जात आहे.

विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीत शिवसेनेच्या लागोपाठ दुसऱ्या पराभवानंतर ‘मातोश्री’वर राणे यांचे महत्त्व कमी झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या राणे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला. कोकणातून मुंबईत आलेल्या राणे यांनी तेव्हा शक्तिप्रदर्शन केले होते. ‘नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देण्यात आल्या. या साऱ्या उद्योगांमुळे राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केले. नार्वेकर हे ‘मातोश्री’वरील नोकर आहेत, अशा शेलक्या शब्दांमध्ये राणे यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. नार्वेकर यांनी शिवसेनेची वाट लावली, इथपर्यंत राणे यांची मजल गेली होती.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय निश्चित झाल्यावर राणे यांनी शिवसेनेत परत येण्याचा आपल्यापुढे प्रस्ताव मांडण्यात आला होता, असा दावा केला. राणे यांचे पूत्र नितेश यांनी मिलिंद नार्वेकर यांनी दूरध्वनी करून राणे यांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले होते. राणे यांनी नार्वेकर यांची संभावना घरगडी अशी केली होती. मग त्याच नार्वेकर यांच्याशी राणे किंवा त्यांच्या पुत्राने संवाद कसा साधला, असा सवाल शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे.

शिवसेनेत परत येण्याचा प्रस्ताव होता, असा दावा राणे करीत असले तरी शिवसेनेच्या गोटातून मात्र त्याचा इन्कार करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळात  ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची विचारपूस करण्याची इच्छा राणे आणि छगन भुजबळ या दोन माजी शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. त्यापैकी भुजबळांना ‘मातोश्री’वर प्रवेश देण्यात आला. पण राणे यांना संमती देण्यात आली नव्हती. कोणत्याही परिस्थितीत राणे यांच्याशी संबंध नकोत, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती व आजही कायम आहे. यामुळे राणे यांना शिवसेनेत पुन्हा यावे, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या वतीने कोणी देण्याची सुताराम शक्यता नाही, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे घरगडी आहेत. त्यांनीच शिवसेनेची वाट लावली    नारायण राणे (शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर २००५ मध्ये केलेले वक्तव्य)

कोणाच्या सल्ल्याने वागायचे हे मला चांगले समजते. मिलिंद नार्वेकर माझे स्वीय सचिव आहेत.  – उद्धव ठाकरे, यांचे प्रत्युत्तर