पक्षनेत्यांच्या गाठीभेटी सुरू; पुढील आठवडय़ात आमदारांची बैठक
विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारीला विरोध होऊ नये, यासाठी त्यांनी पक्षाच्या नेतेमंडळींच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी २४ मे रोजी काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार पक्ष नेतृत्वाला देण्याचा ठराव या वेळी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळी राणे यांना उमेदवारी देण्यास पक्षाच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर यंदा राणे यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राणे यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये भेट घेतली. उमेदवारीला पाठिंबा हवा, अशी अपेक्षा राणे यांनी दोन्ही चव्हाणांकडे व्यक्त केल्याचे समजते.
आघाडीच्या तीन जागा निवडून येणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनीही प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. पक्षाकडून सर्व मते मिळणार असतील तरच लढण्याची राणे यांची योजना आहे. राणे यांच्याबरोबरच विद्यमान आमदार मुझ्झफर हुसेन हे सुद्धा प्रयत्नशील आहेत.

राज्यसभेसाठी जयराम रमेश, चिदम्बरम चर्चेत
राज्यसभेत सुब्रह्मण्यम स्वामी यांना तोडीस तोड उत्तर देण्याकरिता काँग्रेसला आक्रमक नेत्यांची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयराम रमेश हे गेल्या वेळी आंध्र प्रदेशमधून निवडून आले होते. आंध्रमध्ये एकही उमेदवार निवडून येण्याएवढी पक्षाकडे मते नाहीत.जयराम रमेश किंवा चिदम्बरम यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची पक्षाची योजना आहे.