वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नारायण राणे यांच्याबरोबरच ‘एमआयएम’नेही उमेदवार उभा केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. नारायण राणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले, तर शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या राणे यांना ‘मातोश्री’च्या अंगणातच नियतीचा न्याय मिळावा, यासाठी शिवसेनेने प्रचाराची सर्व तंत्रमंत्र अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. ‘एमआयएम’ने आपली लढत काँग्रेसच्या नारायण राणे यांच्याशी नसून शिवसेनेशी असल्याचे सांगत मुस्लिम मते एकगठ्ठा मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाजतगाजत भरला. एवढेच नव्हे तर या मतदारसंघाशी आपली नाळ असल्याचे सांगत याच मुंबईतून नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाल्याचे सांगितले. नेमक्या याच गोष्टीचा वापर प्रचाराचे सूत्र म्हणून शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना आयकर विभागाच्या लिपीकापासून नगरसेवक, आमदार, मंत्री व मुख्यमंत्री केले तेच नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी अवनती होत कोकणातच आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. आता शिवसेना आणि बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्या राणे यांना काँग्रेसनेच राजकीयदृष्टय़ा संपविण्यासाठी ‘मातोश्री’च्या अंगणात पाठवले असून हा नियतीचा न्याय असल्याचे सेनेचे नेते मतदारांच्या मनात बिंबविण्याचे काम करत आहेत.
शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याकडे या मतदारसंघाच्या प्रचाराची सूत्रे असून  आमदार संजय पोतनीस यांच्यासह सेनेच्या नेत्यांवर गल्लीबोळ पिंजून काढून शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या नारायण राणे यांना राजकीयदृष्टय़ा संपविण्यासाठी नियतीनेच त्यांना येथे लढण्याची बुद्धी दिल्याचा मुद्दा मतदारांच्या मनावर बिंबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्या राणे यांना शिवसेनेने मोठे केले मानाची सर्व पदे दिली तेच काँग्रेसमध्ये गेल्यानंतर टप्प्या टप्प्याने संपत आले असून वाद्रे पूर्व मतदारसंघात त्यांची राजकीय कारकीर्द संपेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात सुमारे ८० हजार मुस्लिम मतदार असून गेल्यावेळी एमआयएमला तेवीस हजार मते मिळाली होती तर सेनेच्या प्रकाश सावंत यांना ४१ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थान आता नगण्य असून भाजप सर्वशक्तीनीशी प्रचारात उतरणार असल्याचे अनिल परब म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपचे सर्व नेते प्रचारात सहभागी होणार असल्याने राणे यांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास सेनेनेते व्यक्त करत आहेत.
संदीप आचार्य, मुंबई

अस्तित्वाच्या लढाईसाठी शक्तिप्रदर्शन
मुंबई : राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. उमेदवारी अर्ज भरताना मंगळवारी राणे यांनी मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित होते.
राणे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. कुडाळमधील पराभवामुळे त्यांच्या मोठा राजकीय धक्का बसला होता. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात राणे यांनी पोटनिवडणूक लढविण्याचे धाडस केले आहे. राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने राणे यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. अर्ज भरताना मोठय़ा प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते तसेच स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, संजय निरुपम, नसिम खान, कृपाशंकर सिंग, प्रिया दत्त, शीतल म्हात्रे, संजय दत्त आदी नेतेमंडळी उपस्थित होती. तसेच सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, संजय पाटील हे राष्ट्रवादीचे नेतेही आवर्जून उपस्थित होते.
आपले वास्तव्य खेरवाडी परिसरात होते. या मतदारसंघाशी आपले जुने संबंध आहेत. यामुळे आपण बाहेरचे आहोत हा आरोप चुकीचा असल्याचे राणे यांनी सांगितले. या निवडणुकीत आपण शंभर टक्के विजयी होऊ, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

‘एमआयएम’ची टक्कर शिवसेनेशी
एमएमआयचे वारीस पठाण यांनी तर आमची लढत केवळ शिवसेनेशी असल्याचे सांगून मुस्लिम आरक्षणासह सेना-भाजपने केलेल्या वेगवेगळ्या फसवणुकीमुळे लोक एमआयएमलाच निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत राणे यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली असून सेनेत पदांनी चढत गेलेले राणे काँग्रेसमध्ये जाऊन उताराला लागल्याचे सूत्र प्रचारात वापरण्याचा निर्णय घेतला असून नियतीचा न्याय राणे यांना येथेच बघायला मिळाले, असे सेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितले.