‘नारायण राणे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे,’ अशा घोषणा शिवसेनेला उद्देशून देणारे राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक राणे यांनाच कंटाळून शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. कालिदास कोळंबकर यांचा अपवाद वगळता २००५ मध्ये राणे यांच्याबरोबर बाहेर पडलेल्या बहुतांशी प्रमुख कार्यकर्त्यांनी अन्य मार्ग पत्करला आहे.
राणे यांचे कुडाळमधील कट्टर समर्थक संजय पडते यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार विनायक निम्हण यांनी शिवसेनेचा मार्ग पत्करला होता. राणे यांच्या मुलांना महत्त्व मिळू लागल्याने कोकणातील काही प्रमुख कार्यकर्ते विरोधात गेले. त्यातच राणे पिता-पुत्राच्या पराभवानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांनी राणे यांना सोडचिठ्ठी दिली. राजन तेली आणि संजय पडते हे सुरुवातीपासून राणे यांचे खास समर्थक मानले जायचे. तेली आधीच बाहेर पडले. रवी फाटक यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.