माजी मंत्रीद्वय नारायण राणे व गणेश नाईक हे सोमवारी आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणार असून नाईक पहिल्यांदाच या विषयावर मौन सोडणार आहेत. त्यामुळे गेला दीड महिना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात असलेले संभ्रमाचे वातावरण दूर होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. ७ फेब्रुवारीला आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय तयारीला जोरात सुरुवात झाली आहे.  
याच वेळी  नाईक हे राष्ट्रवादीला रामराम करून भाजप, शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. यासंबंधी ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील. वाशी येथील भावे नाटय़गृहात संध्याकाळी ही सुसंवाद सभा होणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रभारी  नारायण राणे शहरात काँग्रेसला लागलेली गळती थोपविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी ते वाशीत पक्षातील पदाधिकारी व आजीमाजी नगरसेवकांबरोबर चर्चा करतील. कोकणाच्या वेशीवर असलेल्या या शहरातील फूट रोखण्यासाठी राणे काय करणार आहेत ते येत्या काळात स्पष्ट होणार असून पक्षातील सहा नगरसेवकांनी अगोदरच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
 काँग्रेस व राष्ट्रवादी फोडण्याचे काम सध्या राणे यांचे मुख्यमंत्री काळातील सचिव व विद्यमान शिवसेना उपनेते विजय नाहटा करीत असल्याने राणे-नाहटा जुगलबंदी येत्या काळात दिसणार आहे.
दरम्यान, शिवसेनेने निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवलेले माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथे भेट घेतल्याचे समजते.