आपल्याच चिरंजीवाने मारहाण केलेल्या संदीप सावंत यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे बुधवारी दुपारी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल झाले. राणे यांनी संदीप सावंत यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी काहीवेळ चर्चा केली. संदीप सावंत आमचा कार्यकर्ता आहे. त्यांना सर्वोतोपरी मदत करणार, असे राणे यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
माजी खासदार नीलेश राणे, त्यांचा स्वीय सहायक तुषार व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात संदीप हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहाता नीलेश यांना अटक होण्याची शक्यता आहे. पण त्यांना अद्याप अटक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.