कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने संतप्त नारायण राणे पुन्हा एकदा बंडाच्या पवित्र्यात असून, लवकरच काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली तेव्हाही राणे यांनी थेट राहुल गांधी लक्ष्य करून बंड केले होते. यावरून त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा पराभवानंतर त्यांनी बंडाचे निशाण उभारले होते. तेव्हाच काँग्रेसला रामराम करण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र पुन्हा ही तलवार त्यांनी म्यान केली. त्यामुळे आता स्वाभिमानी राणेंचे हे कॉंग्रेसमधील तिसरे बंड यशस्वी होणार की नाही, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. बदलत्या परिस्थितीत राणे यांनी टोकाची भूमिका घेतली तरी कॉंग्रेस त्यांनी फार गांभीर्याने घेणार नाही, असे चित्र आहे.
अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यांची तयारी नाही. काँग्रेसमध्ये फार किंमत मिळत नसल्याचे पाहून अन्य पर्यायांचा विचार ते करीत आहेत. भाजपकडून त्यांना प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेची परतीची दारे केव्हाच बंद झाली आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध असू शकतो. अर्थात, राणे यांचे पुत्र नितेश हे काँग्रेसचे आमदार असल्याने ते विचारपूर्वक निर्णय घेतील, असे सांगण्यात येते.
अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदी निवडीनंतर राहुल गांधी व अन्य नेत्यांना लक्ष्य करून राणेंनी बंड केले होते. यावरून त्यांना पक्षातून निलंबितही केले होते. पुढे राणे यांना पक्षात प्रवेश देऊन मंत्रिपद देण्यात आले. गेल्या वर्षी लोकसभा पराभवानंतर विधानसभेतील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगत राणे यांनी बंडाचे निशाण उभारले होते. तेव्हाच काँग्रेसला रामराम करण्याची राणे यांनी तयारी केली होती. भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत फार काही अनुकूलता दर्शविण्यात न आल्याने राणे यांनी पुन्हा एकदा पक्षात राहण्याचे जाहीर केले होते, असे काँग्रेसच्या गोटातून तेव्हा सांगण्यात येत होते. आता पुन्हा एकदा राणे संतप्त झाले आहेत. पक्षाची सारी सूत्रे आता राहुल गांधी यांच्या हाती जाणार आहेत. राणे यांनी मागे राहुल यांनाच लक्ष्य केले होते. तसेच बदलत्या परिस्थितीत राणे यांनी टोकाची भूमिका घेतली तरी पक्षाकडून फार काही गांभीर्याने घेतले जाणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पराभवापासून पक्षाने काही धडा घेतलेला नाही, असा हल्ला चढवीत त्यांनी दिल्लीतील नेत्यांना सोमवारी आव्हान दिले. राणे उद्या, मंगळवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

१ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर आपण पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांना पत्र पाठविले होते. या पत्रामुळेच बहुधा आपल्याला डावलले गेले असावे, अशी शक्यता राणे यांनी बोलून दाखविली.

२ दोन्ही नियुक्त्या करताना आपल्याशी चर्चा झाली नाही. या दोन्ही नियुक्त्यांवरून काँग्रेस अधोगतीकडे जात आहे हे स्पष्टच होते. अशोक चव्हाण यांची क्षमता लक्षात घेऊनच त्यांची निवड झाली असावी,  असे राणे म्हणाले.

मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता मराठी नेत्याची निवड व्हावी, अशी अपेक्षा होती. पण चार लाख मतांनी पराभूत झालेल्या निरुपम यांची नियुक्तीने काय साधले.