वारंवार आश्वासन मिळूनही महत्त्वाचे पद न मिळाल्याने नाराज असलेले उद्योगमंत्री नारायण राणे आज, सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याऐवजी पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करून स्वत:वर हकालपट्टी ओढवून घेण्याचा राणे यांचा प्रयत्न असेल, असे सांगण्यात येते. दुसरीकडे, राणे यांच्या नाराजीची दखल घेऊन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांची समजूत काढण्याच्या सूचना पक्षनेत्यांना दिल्या आहेत. मात्र, राणे फार काळ काँग्रेसमध्ये राहण्याची शक्यता कमीच आहे.
..तर राणेंचे ‘उद्योग’ बाहेर काढू 
राजीनाम्यानंतर राणे लगेचच काँग्रेस पक्ष सोडण्याची शक्यता कमी आहे. पण मुख्यमंत्री अथवा अन्य नेत्यांवर सारखी टीका वा आरोप केल्यास काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी होऊ शकते. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर राणे काँग्रेसविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. रविवारी कणकवलीत झालेल्या सभेत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत याची सुरुवातही केली. ‘लोकसभा निवडणुकीत राज्यात ज्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकांना सामोरी गेली. त्याच नेतृत्वाखाली लढल्यास लोकसभेसारखाच दारुण पराभव होईल,’ असे राणे म्हणाले. ‘काँग्रेस पक्षाने मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे हे कोकणचे वादळ निर्माण झाले आहे. कोकणच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादीवर टीका टाळली
राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. महागाईबद्दल मोदी सरकारवर टीका केली. ‘अच्छे दिन नव्हे तर बुरे दिन आले’ अशी टीकाही केली. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचे टाळले आहे.
शिंदे मध्यस्थाच्या भूमिकेत?
राणे काँग्रेस सोडणार हे जवळपास निश्चित झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राणे यांच्या भावना ठाकरे यांनी सोनियांच्या कानावर घातल्याचे समजते. राणे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.