शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. उभयता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत, पण सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेचा आणखी एक इशारा तर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे नारायण राणे यांनी दिलेले संकेत हे एकाच दिवशी घडल्याने हा योगायोग की राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे अस्वस्थ शिवसेनेने दिलेला इशारा याची मग चर्चा सुरू झाली.

सत्तेत राहून कामे होत नसल्याने शिवसेना आमदारांनी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केले. नारायण राणे यांचा भाजप प्रवेश किंवा त्यांचा किंवा त्यांच्या पूत्राचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता लक्षात घेता शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेनेचे ‘इशारों पे इशारे’ सुरू असतानाच कोकणात नारायण राणे यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडाचे निशाण रोवले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली. राणे यांनी समर्थ पॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायती लढविण्याचे जाहीर केले, पण त्याच वेळी २१तारखेला घटस्थापनेच्या दिवशी भावी राजकीय वाटचालीची घोषणा केली. शिवसेना आणि राणे यांनी एकाच दिवशी आपापल्या दृष्टीने घेतलेल्या टोकांच्या भूमिकेमुळे त्याची चर्चा जास्त रंगली.