एकीकडे काँग्रेसमध्ये होणारी कोंडी तर दुसरीकडे पक्ष सोडल्यास तेवढय़ा तोडीचा पर्याय उपलब्ध नसणे अशी अवस्था माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता समर्थकांशी चर्चा करून पुढील आठवडय़ात भूमिका स्पष्ट करण्याचे राणे यांनी मंगळवारी जाहीर केले.  
प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती झाल्याने राणे अस्वस्थ झाले आणि त्यांनी पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले. राणे हे तिसऱ्या बंडाच्या पवित्र्यात असल्याने त्याची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली व त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबद्दल तर्कवितर्क सुरू झाले. त्यातच मंगळवारी आपण आपली भूमिका जाहीर करू, असे राणे यांनी जाहीर केल्याने त्यांचे समर्थकही त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. राणे हे सहा दिवसांच्या चीन दौऱ्यावर रात्री उशिरा रवाना झाले असून, रविवारी ते परतणार आहेत. परदेशातून परतल्यावर आपण समर्थकांशी चर्चा करून मगच पुढील भूमिका स्पष्ट करू, असे राणे यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे राणे यांच्या एकूणच वक्तव्यावरून स्पष्ट झाले. काँग्रेस सोडण्याचा त्यांचा विचार असला तरी अन्य पर्याय कोणता, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अन्य पक्षही राणे यांना प्रवेश देण्याबाबत फार काही उत्सूक नाहीत. राष्ट्रवादीचा पर्याय असला तरी काँग्रेसप्रमाणे त्या पक्षात तोंड उघडणे कठीण आहे. पूत्र नीतेश काँग्रेसचे आमदार असल्याने पक्ष सोडल्यास राजीनामा देऊन परत निवडून आणावे लागेल. काँग्रेसमध्ये फार काही डाळ शिजणे कठीण आहे. राहुल गांधी यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता कमी आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता राणे अस्वस्थ आहेत. यामुळेच अन्य नेत्यांशी चर्चा करूनच मग पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राणे यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या पाश्र्वभूमीवर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण दिल्लीतून राणे यांच्या कथित बंडाची दखल घेतली गेलेली नाही. दिल्लीच्या कोणत्याही नेत्याने आपल्याशी संपर्क साधलेला नसल्याचे राणे यांनीही स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये यापुढेही राहायचे असल्यास राणे यांना स्वत:ला पक्षाशी जुळवून घ्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

नवीन प्रथा पाडली
पक्ष वाढीसाठी कोणते उपाय योजले पाहिजेत हे पत्र आपण पक्षाध्यक्षांना पाठविले. पक्षाच्या नेत्यांना सल्ला दिल्याबद्दल काही जणांच्या भुवयाही उंचावल्या. काँग्रेसमध्ये अशी प्रथा नाही, असे आपणास सांगण्यात आले. पण पक्ष वाढीसाठी आपण ही नवी प्रथा पाडली आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून, लादलेले नेतृत्व यशस्वी होत नाही, असा टोलाही त्यांनी पक्षाच्या नेत्यांना उद्देशून मारला.