लुटुपुटुची लढाई की खरा राजकीय सामना?

‘बारामतीमधील काका-पुतण्याचे साम्राज्य खालसा करा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारसभेत केले होते. त्याच बारामतीमध्ये अवघ्या काही महिन्यांमध्ये झालेल्या सभेत मोदींनी पवारांचे गोडवे गायले होते. ही पाश्र्वभूमी असतानाच बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी बारामतीचा दौरा करणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील ही लुटुपुटुची लढाई आहे की काय, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला आहे.

बारामती नगरपालिकेची निवडणूक पुढील बुधवारी होत असून, ३९ सदस्यीय पालिकेत भाजपने जोर लावला आहे. बारामतीची निवडणूक ही शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. लोकसभा, विधानसभापाठोपाठ नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने शिरकाव केला. या पाश्र्वभूमीवर बारामतीचा गड राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान आहे. पवारांना शह देण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी संयुक्त उमेदवार उभा केला आहे.

पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला प्रचार भाजपच्या दृष्टीने फायदेशीर ठरला होता. सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले होते. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या १४ नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. बारामतीमध्ये शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

बारामतीमधील सभेत मुख्यमंत्र्यांना पवार यांना लक्ष्य करावे लागणार हे निश्चित. पवारांच्या काळात बारामतीचा विकास झाला नाही वगैरे टीकाटिप्पणी करावी लागेल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात बारामतीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी पवार काका-पुतण्याचे साम्राज्य खालसा करा, असे आवाहन केले होते. या सभेत मोदी यांनी पवारांवर टीकाही केली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत बारामतीमध्ये आलेल्या मोदी यांनी पवारांचे तोंडभरून कौतुक केले होते. पवार केंद्रात मंत्री तर आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी आपल्याला नेहमीच मदत केली होती याची आठवण मोदींनी सांगितली होती. मोदी यांच्यानंतर बारामतीत आलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही पवारांच्या कामाची स्तुती केली होती. मोदी आणि जेटली या दोघांनीही बारामतीच्या विकासाबद्दल पवारांचे तोंडभरून कौतुक केले होते. याच बारामतीमध्ये फडणवीस यांना पवारांवर टीका करावी लागणार आहे. बारामतीत सभा घेऊन पवारांवर टीका केली नाही तर त्याची वेगळी प्रतिक्रिया उमटू शकते. बारामतीमध्ये सभा घ्यावी की नाही यावरून भाजपमध्ये बराच खल सुरू होता. पण शेवटी सभा घेण्याचे निश्चित झाले.

फडणवीस विरोधातच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शरद पवार यांच्याशी उत्तम संबंध असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पवारविरोध लपून राहिलेला नाही. मराठा मोर्चावरून राजकारण सुरू झाल्यावर अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पवारांवर या साऱ्यांचे खापर फोडले होते. सत्ता गेल्याने हताश झालेले काही नेते फूस लावत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. कोणाचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले होते, पण त्यांचा सारा रोख हा पवारांवरच होता. पवारांनी त्यांच्या शेलक्या शैलीत फडणवीस यांच्यावर अनेकदा टीकाटिप्पणी केली आहे. अलीकडेच पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी तर नळावर वचावचा भांडणाऱ्या बायकांची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली होती. पवार आणि फडणवीस यांच्यात नेहमीच दुरावा राहिल्याचे सांगण्यात येते.

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना रुचली नव्हती. राष्ट्रवादीचे लोढणे गळ्यात नको म्हणूनच फडणवीस यांनी शिवसेनेबरोबरील मतभेद मिटवून सेनेला सत्तेत सहभागी करून घेतले होते. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना परवडली, असे फडणवीस यांचे गणित आहे.

मोदी आणि पवार यांचे संबंध चांगले असले तरी राज्यातील राजकारणात भाजपला राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागते. राज्याच्या सर्व भागांत भाजप वाढवायचा असल्यास काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीला अंगावर घ्यावे लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात भाजपला अलीकडेच यश मिळाले आहे. यामुळेच पवारांशी भाजप दोन हात करीत आहे, हा संदेश गेल्याशिवाय सहकार क्षेत्रात यश मिळणार नाही, असे भाजपचे गणित आहे.

  • बारामतीची निवडणूक ही शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या टप्प्यात फारसे यश न मिळाल्याने बालेकिल्ला राखण्याचे आव्हान पवार काका-पुतण्यापुढे आहे.