‘मेक इन इंडिया’ केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
डिसेंबरमधील उणे स्थितीतील औद्योगिक उत्पादन क्षेत्राची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे शुक्रवारी स्पष्ट होऊनही देशाच्या आर्थिक राजधीनीच्या मध्यभागी भरलेल्या उद्योग प्रदर्शनात मात्र शनिवारी उत्साह दिसून आला. मोकळे रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक आणि भव्य सभागृह अशी जोड मिळालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहातील सहभागी प्रदर्शक, उद्योजकांमध्ये नव्याने काही करण्याची उर्मी दिसत होती.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने वांद्रे – कुर्ला संकूलातील एमएमआरडीए मैदानावर भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. त्यांच्याबरोबर यावेळी स्विडनचे पंतप्रधान केल स्टिफन व फिनलॅन्डचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला हेही उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री निर्मला सितारामन, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, भारतीय औद्योगिक महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आदींनीही पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर प्रदर्शन स्थळी असलेल्या विविध दालनांना भेट दिली.
महाराष्ट्राच्या विशेष दालनाच्या पाहणी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे शाल देऊन स्वागत केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ दालनातील वाहन प्रदर्शनाची पंतप्रधानांनी सखोल विचारपूस करत दालनातील मनोरंजन, कला आदी छोटेखानी दालनातील मांडणीही यावेळी जाणून घेतली.
२०१६ ची सुरुवात वाहन उद्योगाने कमी विक्रीपोटी निराशाजनक केली आहे. मात्र प्रदर्शनात सहभागी मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, जग्वार लॅण्ड रोव्हर आदी कंपन्यांच्या दालनांमधील आयोजकांमध्ये उत्साह होता. संरक्षण विभागाच्या दालनांमध्ये टाटा व रिलायन्स यांच्या हवाई क्षेत्रातील कामगिरीची झलक येथे आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमा दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, रेमंडचे सिंघानिया आदी उद्योजक यावेळी उपस्थित होते.
सकाळच्या ‘मेक इन इंडिया’ केंद्राच्या उद्घाटनानंतर पतप्रधानांनी या विषयावरील प्रदर्शनाचे सायंकाळी वरळीच्या वांद्रे – कुर्ला संकूलातील एमएमआरडी मैदानावरील २.२० लाख चौरस मीटर जागेवरील हे प्रदर्शन १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.