वैद्यकीय विज्ञानाचे रूप बदलत आहे. डॉक्टरांच्या आधी उपकरणांनी जागा मिळवली आहे. उपकरणांनी निदान केल्यानंतर डॉक्टर उपचाराची दिशा ठरवत असून देशाच्या ग्रामीण भागापर्यंत प्रभावी वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय उपकरणे भारतात निर्मित होणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना यापुढे प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. देशातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना गोरगरीब रुग्णांना प्रभावी आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी या वेळी मांडली. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाल्यास निम्मे आजार दूर होतील. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही ते म्हणाले. एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचा कायापालट केल्याबद्दल मोदी यांनी नीता व मुकेश अंबानी यांचे विशेष आभार मानले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमंत्रण असूनही या समारंभास अनुपस्थित राहिले. मोदी यांना सामोरे जावे लागू नये यासाठीच उद्धव यांनी उपस्थित राहण्याचे टाळले, अशी चर्चा होती.
आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा मुळात आजारीच पडू नये याला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त प्रभावी वापर सरकार करेल. टेलिमेडिसिनचे जाळे सर्वदूर नेण्याची सरकारची योजना असून त्याच्या माध्यमातून चांगल्या डॉक्टरांचे उपचारासाठी ग्रामीण, तसेच दुर्गम भागात मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल. भारतात बालमृत्यू व मातामृत्यूंचे प्रमाण मोठे असून प्राथमिक आरोग्याचे जाळेही सर्वदूर न्यावे लागणार आहे. वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग भारतातच विकसित झाल्यास गोरगरीब रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल, असेही मोदी यांनी सांगितले.
जेवणापूर्वी हात न धुतल्यामुळे पाकिस्तानमध्ये ४० टक्के बालमृत्यू झाल्याचे या वेळी बोलताना त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि स्वच्छ पाणी, तसेच आरोग्याची स्वच्छता याबाबत काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.