राज्य मार्गावरील टोलमधून कार, एसटीसारख्या वाहनांना मुक्त केल्यानंतर राज्य सरकारने आता आपला मोर्चा मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांकडे वळविला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांमधूनही छोटय़ा वाहनांना सवलत देण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तर १ ऑगस्टपूर्वी मुंबई-ठाणेकरांची टोलमधून सुटका करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जाहीर केले.
राज्यातील आणखी १२ मार्गावरील टोलनाके  कायमचे बंद तर  ५३ टोलनाक्यांवरून कार तसेच एसटी आणि स्कूलबस यांना टोलमधून वगळण्याची घोषणा राज्य सरकारने शुक्रवारी केली. मात्र मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाके आणि ठाणेकरांवरील टोलचा भरुदड कायम राहणार असल्याने सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त होत होती. लोकांमधील या असंतोषाची दखल घेत मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधूनही लोकांची सुटका करण्याबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचप्रमाणे राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधूनही लोकांची सुटका व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून कार व छोटय़ा वाहनांना वगळण्याचा प्रस्ताव त्यांच्या विभागाने तयार केला असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तो सादर केला जाणार आहे. केंद्राच्या निर्णयानंतर याही टोलमधून छोटय़ा वाहनांना टोलमाफी मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त  केला. कारसारख्या छोटय़ा वाहनांना टोलमाफी देण्यात आली असली तरी त्याचा भार अवजड वाहनांवर पडणार नाही. पूर्वीच्या कराराप्रमाणेच त्यांचा टोलदर राहील, असे सांगण्यात आले.