सध्या केवळ आपल्या नेटवर्कच्या वर्तुळामध्ये शक्य असलेली पोर्टेबिलिटी आता ३ मे पासून संपूर्ण देशात करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय नंबर पोर्टेबिलिटी संदर्भात ‘टेलिकॉम नियामन प्राधिकरण’ (ट्राय)ने सरकारला एक मसुदा सादर केला आहे.
नंबर पोर्टेबिलिटी सुरू करून ‘ट्राय’ने कोटय़वधी मोबाइल ग्राहकांना दिलासा दिला. यामुळे ग्राहकांना त्यांना आवडेल अशी मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणारी कंपनी निवडणे शक्य झाले. पण ही सुविधा गुजरात वगळता इतर देशामध्ये केवळ नेटवर्क वर्तुळांपुरतीच मर्यादित होती. पण आता ही सेवा राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्याच्या उद्देशाने ट्रायने एक मसुदा तयार केला असून तो सरकारकडे सादर केला आहे. हा मसुदा तयार करण्यासाठी २००९मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती.
 या समितीने तयार केलेल्या मसुद्यामध्ये नंबर पोर्टेबिलिटीच्या कालावधीतही बदल सूचविण्यात आला आहे. यानुसार सध्या ग्राहकाने एकदा नंबर पोर्टेबिलिटी केल्यानंतर पुन्हा पोर्टेबिलिटी करण्यासठी ९० दिवस वाट पाहावी लागत होती. हा कालावधी ६० दिवसांवर आणण्याची सूचना करण्यात आली आहे. या मसुद्याबाबत काही सूचना करण्यासाठी तो सर्वासाठी  http://www.trai.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर ६ फेब्रुवारीपर्यंतadvmn@trai.gov.in किंवा trai.mn@gmail.com सूचना  कळवायच्या आहेत.