नवी मुंबई महानगरपालिकेत मंगळवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या विशेष महासभेत १०५ विरुद्ध ६ अशा संख्येने हा ठराव मंजूर झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेनेसह पाच अपक्ष नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मतदान केले.तर कालपर्यंत तटस्थ असणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, ठरावावर मत मांडू न दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाच्या कामकाजावर आक्षेप घेतला. आयुक्तांविरोधातील हा अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी राज्य सरकारने अंतिम निर्णय घेईपर्यंत तुकाराम मुंडेंना धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा असेल. हा ठराव आणण्यासाठी स्थायी समितीच्या १४ सदस्यांनी दिलेले पत्र महापौर सोनावणे यांनी गुरुवारी पालिकेच्या सचिवांकडे सोपवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी या पत्रावर सहय़ा केल्या होत्या, मात्र भाजप सुरूवातीपासूनच अविश्वास ठरावाच्या विरोधात होता. आयुक्त मुंढे यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी आपापल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी केले होते. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे आजपासून अनिश्चित कालावधीसाठी सुट्टीवर जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास आयुक्त मुंढे हे नेहमीप्रमाणे महापालिकेच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी दैनंदिन कामकाजास सुरूवात केली.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार मोठ्याप्रमाणावर चाप लावला होता. त्यामुळे स्थानिक राजकारणी, बिल्डर आणि शिक्षणसम्राटांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र, दुसरीकडे प्रशासन गतिमान करणाऱ्या मुंढेंना सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहे. अविश्वास ठरावानंतर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी महापालिका परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.