नवी मुंबई पालिकेच्या सत्तासोपानावर गेली वीस वर्षे अधिराज्य गाजवणारे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या हातातून या वेळी सत्तेचा सुकाणू खेचून आणण्याचे आव्हान शिवसेना-भाजप युती व काँग्रेस यांच्यापुढे आहे. ही निवडणूक आता भ्रष्टाचाराचे आरोप विरुद्ध विकासाचा बोलबाला या दोन मुद्दय़ांवर येऊन ठेपली आहे. नाईक यांनी ही लढाई जिंकली, तर ते पालिकेवर २५ वर्षे सत्ता टिकवणारे राज्यातील एकमेव नेते ठरतील. त्यामुळे विरोधक आणि नाईक या दोघांच्या अस्तित्वाची लढाईच मानली जात आहे.
जेमतेम बारा लाख लोकवस्तीचे नवी मुंबई गाव, गावठाण, शहर झोपडपट्टी अशा तीन नागरी वस्तीने बनलेली आहे. गेली १५ पालिकेतील सत्ता ही नावाला राष्ट्रवादीची असली तरी ती नाईकांची सत्ता मानली गेली आहे. गेली ४५ वर्षे शहरातील बहुतांशी नागरिकांच्या सुखदु:खाला धावून गेल्याने नाईक यांचा एक हक्काचा मतदार असून ते इतर कोणत्याही पक्षात असते तर त्या पक्षांची पालिकेवर सत्ता मानली गेली असती. त्यामुळे ते सेनेत होते तेव्हा सेनेची, तर राष्ट्रवादीत गेले तेव्हा राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. येथील विजयाचे किंवा पराजयाचे नाईक हेच जबाबदार राहणार आहेत. शिवसेनेच्या प्रचाराची सुत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. तर विधानसभेला बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे भाजपकडून विजयी झाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेवटपर्यंत सेना-भाजप वेगवेगळे लढणार असल्याचे वातावरण झाल्याने दोन्ही पक्षांत इच्छुकांचा कुंभमेळा लागला होता. त्यात युती करण्याचा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घेतल्याने सेनेतील इच्छुक बिथरले. ‘कामाला लागा’ या पवारनीतीचा सेनेतील एका उपऱ्या उपनेत्याने उपयोग केल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी वारेमाप खर्च केला. त्यात राष्ट्रवादीतून येणाऱ्यांना लाल पायघडय़ा घालण्यात आल्यामुळे सेनेतील ४१ सैनिकांनी बंडखोरी केली, तर भाजपमधील पाच जणांनी प्रवेश करतानाच बंडाचा झेंडा फडकविला. त्यामुळे सेनेच्या हातातोंडाशी आलेला घास नेत्यांच्या आततायीपणामुळे निसटल्याचे चित्र निर्माण झाले. शहरात असलेला ग्रामीण, झोपडपट्टी व माथाडी कामगारांच्या जोरावर नाईक हा किल्ला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेसचे बुरे दिन इथेही असून उमेदवार मिळणे कठीण झाले होते. कसेबसे या पक्षाने ८९ जागांवर उमेदवार उभे केले असून हा पक्ष दोन आकडी नगरसेवकांची संख्यादेखील गाठू शकणार नाही अशी स्थिती आहे. याशिवाय शेजारच्या रायगड जिल्हय़ातील शेकापने ३६ उमेदवार उभे करून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रचारात गाजलेले मुद्दे
* पालिकेतील निविदांमधील भ्रष्टाचार, घराणेशाही, एकाधिकारशाही हे विरोधकांचे मुद्दे
* वीस वर्षांत केलेली नागरी कामे व नवी मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांत नसलेले डंपिग ग्राऊन्ड, पिण्याच्या पाणीटंचाई, मराठी शाळांमधील घसरती पटसंख्या ही सत्ताधारी पक्षाची बाजू

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>