नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारण देत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
१९८२ च्या तुकडीचे अधिकारी असणारे प्रसाद यापूर्वी राज्य गुप्तचर विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. मुंबईत २००७ मध्ये त्यांनी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणूनही काम पाहिले होते. राज्य शासनाकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी कोणतेही कारण नमूद केलेले नाही. लवकरात लवकर आपला राजीनामा मंजूर करावा, असेही त्यांनी या पत्रात म्हटले असल्याचे राज्याचे गृहसचिव के. पी. बक्षी यांनी सांगितले. प्रसाद सध्या रजेवर गेले आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद सध्याच्या नियुक्तीवर नाराज होते. गेल्या दीड वर्षांत सत्यपाल सिंह, गुलाबराव पोळ, पी. के.जैन आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे.