पाच अपक्षांच्या मदतीने नवी मुंबईचा महापौर राष्ट्रवादीचा बनविण्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे मनसुबे उधळण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विडा उचलला आहे. पाच अपक्षांपैकी एकाला महापौर आणि अपक्षाच्या नेत्याला सिडकोचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे अपक्षांचा भाव वधारला आहे.  राष्ट्रवादीकडे असलेल्या अपक्षांना पंधरा दिवसांसाठी परदेशात हलविण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. सेनेने राष्ट्रवादीतील सहा नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांना फोडण्याचाही प्रयत्न केला आहे. राजीनामा देऊन पुन्हा निवडून आणण्याची या नगरसेवकांची जबाबदारी घेतली जाणार आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीत मतदाराने शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी या पक्षांना थोडय़ाफार फरकाने एकाच मर्यादेपर्यंत ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष (५२) म्हणून पुढे आला असला तरी त्यांना बहुमतासाठी लागणाऱ्या पाच नगरसेवकांनाच फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे स्थानिक पातळीवर नाईकांशी फारसे सख्य नसल्याने काँग्रेसच्या दहा नगरसेवकांच्या पाठिंब्यावर युतीची (४४) सत्ता आणण्याची खेळी खेळली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व युतीला पाच अपक्षांची सारखीच गरज लागत असून, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले सोनावणे दाम्पत्याशी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीबरोबरच महापौरपदाचा प्रस्ताव युतीकडूनही देण्यात आला आहे. रत्यामुळे सोनावणे यांची द्विधा स्थिती झाली असून राष्ट्रवादी की युती असा पेच पडला आहे.
 नाईक यांची मदार असलेल्या इतर तीन अपक्ष नगरसेवकांपैकी अपक्ष सीमा गायकवाड यांचे नेते घन:श्याम मढवी यांना सिडकोच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. गणेश नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली असून माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. जोखीम टाळण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी होणार असून काँग्रेसला सत्तेत काही पदे मिळणार आहेत, पण काँग्रेसच्या नगरसेवकांना सोनावणे हे महापौरपदाचे उमेदवार म्हणून मान्य नाही. आपले नगरसेवकही प्रलोभनाला बळी पडू नयेत यासाठी त्यांच्यासाठी १४ दिवसांची सहल आखण्यात आली आहे.
नाईकच भाजपच्या संपर्कात -मेहता
राष्ट्रवादीच्या संपर्कात भाजपचे चार नगरसेवक असल्याच्या प्रश्नावर नाईक स्वत: अजूनही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची गुगली रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी टाकली आहे. ते एका खासगी गृहसंकुलाच्या उद्घाटनासाठी पनवेलमध्ये आले होते. त्यामुळे मेहता यांनी नाईक यांच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे.