आयोजकांकडून तारांकित गायकांसोबत सुविधांच्याही जाहिराती

एका रात्रीसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय, वातानुकूलित सभागृह, पुरेशी स्वच्छतागृहे.. या कोणत्याही ‘टूर पॅकेज’च्या घोषणा नाहीत तर, मुंबईत नवरात्रोत्सवाच्या विविध आयोजकांनी आपल्या मंडपाकडे गरबाप्रेमींना खेचून आणण्यासाठी दाखवलेली प्रलोभने आहेत. गेल्या काही वर्षांपासून गुजरातकडे मोर्चा वळवणाऱ्या नामवंत गायक, कलाकारांनी यंदा आपली पावले पुन्हा मुंबईकडे वळवली असतानाच गरबाप्रेमींना आकर्षक सुविधांचे आमिष दाखवून पाच-सहा हजारांचे प्रवेशशुल्क आकारणाऱ्या आयोजकांमध्ये यानिमित्ताने वेगळीच स्पर्धा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील नवरात्रोत्सवाला एकेकाळी गुजरातपेक्षाही अधिक वलय होते. नामवंत गायक, वादकांच्या सुरावटींवर गरबा, दांडिया खेळण्याची पर्वणी, विविध ठिकाणी तारेतारकांची हजेरी आणि आकर्षक बक्षिसांची लयलूट यामुळे मुंबईत नवरात्रीत गरबाप्रेमींच्या उत्साहाला उधाण येत असे.  परंतु, ध्वनिप्रदुषणाबाबतचे र्निबध आणि आर्थिक कारणांमुळे अनेक ‘दांडिया क्वीन’नी आपला मोर्चा गुजरातकडे वळवल्याने मुंबईतील जोश काहीसा कमी झाला होता. परंतु, यंदा हे चित्र पुन्हा पालटल्याचे दिसून येत आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नवरात्रोत्सवासाठी मायानगरी सज्ज झाली आहे. बंद सभागृहांपासून ते हॉटेल्स, ३२००० चौरस फूट जागेच्या मोकळ्या मैदानात यंदा दांडिया रास भरविले जाणार आहेत. बोरिवली, गोरेगाव, घाटकोपर, विलेपाल्रे, जुहू अशा विविध भागात मिळून यंदा तब्बल ७० प्रकारच्या दांडियारासचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय अनेक ठिकाणी फाल्गुनी पाठक, प्रिती-िपकी, निलेश ठक्कर, रफीक शेख, विशाल कोठारी आणि भूमि त्रिवेदी यांसारख्या नामांकित गायक कलाकार सहभागी होणार आहेत. ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक ‘पुष्पांजली नवरात्री उत्सवा’ अंतर्गत बोरीवलीकरांना थिरकायला लावणार आहे. ‘एरवी रात्री १० पर्यंत असलेली आवाजाची मर्यादा नवरात्रात तीन दिवस रात्री १२पर्यंत नेण्याची परवानगी मिळते. यंदा आणखी एक दिवस वाढवून मिळावा असा आयोजकांचा प्रयत्न आहे,’ असे पाठक हिच्या संपर्कप्रमुख साधिया खान यांनी सांगितले. यंदाच्या नवरात्रोत्सवादरम्यान दोन विकेंड आल्यामुळेही गर्दी वाढेल, असा आयोजकांचा अंदाज आहे.

गरबाप्रेमींना आकर्षित करण्याकरिता सहारा स्टारसारख्या आयोजकांनी एक रात्र त्यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचे प्रलोभन दाखवले आहे.  याबरोबर जेवण निशुल्क असणार आहे. सांताक्रुझला वातानुकूलित सभागृहात हा दांडिया रंगणार आहे. तर नायडू क्लबने बोरीवलीच्या कोरा केंद्रात तब्बल १५ हजार गरबाप्रेमींना सामावून घेण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे.

बोरीवली यंदा दांडिया हब

यंदा तीन मोठय़ा गरब्यांचे आयोजन बोरीवलीत करण्यात आले आहे. त्यामुळे, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गुजरातीबहुल बोरीवली त्यातही पश्चिमेकडील भाग ‘दांडिया हब’ म्हणून यंदा उदयास आला आहे.

गरब्याचे काही मोठे आयोजक

  • पुष्पांजली नवरात्र उत्सव, बोरिवली (प.)
  • नायडू क्लब, कोराकेंद्र, बोरिवली (प.)
  • डोम रास गरबा, एनएससीआय
  • कच्छी ग्राउंड, ऑरा हॉटेजवळ, बोरिवली (प.)
  • संकल्प दांडिया नवरात्री ग्रुप, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब, मालाड (प.)
  • सोमय्या कॉलेज ग्राऊंड, विद्याविहार

तिकिटांचे दर सहा हजारांवर

गरब्यासाठीच्या तिकीटांचे दर प्रत्येक मंडळाप्रमाणे वेगळे आहेत. काही आयोजकांनी सुट्टीच्या आदल्या रात्रीच्या तिकीटांचे दर काहीसे अधिक ठेवले आहेत. बोरीवलीत फाल्गुनी पाठक हिच्या सुरांवर थिरकायचे असेल तर सुमारे चार हजार रुपये मोजण्याची तयारी दांडियाप्रेमींना दाखवावी लागणार आहे. तर सहारा स्टरने आयोजिलेल्या पंचतारांकित दांडियासाठी हाच दर पाच ते सहा हजार इतका आहे.