वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे नवरात्र. आदिशक्तीचा नवरात्रींच्या उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला. या काळात आदिशक्तीची उपासना करण्यासाठी घरोघरी घटस्थापना करण्यात आली. तर काहींच्या घरी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याचबरोबर शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सवही साजरा होत असून रोज रात्री तेथे दंडिया आणि गरब्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच पावसाने हजेरी लावली असली तरी गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी तरुणाई मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरली होती. पहिल्या दिवशी शनिवार असल्यामुळे बोरिवली येथे सुरू असलेल्या फाल्गुनी पाठक आणि प्रीती आणि पिंकी यांच्या कार्यक्रमालाही हजारोंच्या संख्येने तरुणाईने उपस्थिती लावली होती. या उत्सवासाठी खास कपडय़ांच्या खरेदीपासून ते नानाविध मेकअप, टॅटू आदी बाजारपेठाही खुलल्या आहेत. यंदा मुंबईतील अनेक गृहसंकुलांनी उत्सवाच्या सादरीकरणात कालानुरुप बदल करत पारंपरिक गरब्यांच्या जोडीला डीजेचा आवजही जोडला. यामुळे गृहसंकुलातील उत्सवालाही तरुणाईने हजेरी लावली. या सर्व उत्सवामध्ये सामाजिक संस्थांतर्फे मुंबईच्या आवाजाची पातळी नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्याचे कामही एकीकडे सुरू होते. तर या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होत्या.