भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच्या निर्णयक्षमतेचा कोणत्या प्रसंगी कस लागतो, या सेवेतील करिअर करताना कोणती तयारी करावी लागते, सैन्यदलात जाण्याआधीचे प्रशिक्षण नेमके कसे असते, नौदलात मुलींना नेमक्या कोणत्या प्रकारचे काम करता येते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सनदी सेवा आणि नौदलातील दोन कर्तबगार अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकायची संधी मंगळवारी ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. पंचविसाव्या व्हिवा लाउंज कार्यक्रमात आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आणि नौदल अधिकारी सोनल द्रविड यांच्याबरोबर थेट संवाद साधता येईल.
व्हिवा लाउंजच्या माध्यमातून आतापर्यंत विविध क्षेत्रांतील कर्तबगार स्त्रियांकडून त्यांच्या यशगाथा ऐकता आल्या. या वेळच्या रौप्यमहोत्सवी व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर प्रथमच सैन्यदलातील महिला अधिकारी कमांडर सोनल येत आहेत. कमांडर सोनल द्रविड भारतीय नौदलाच्या शैक्षणिक विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संरक्षण दलात जाण्याचा निर्णय घेतला. कमी वयातच नौदल शिक्षण विभागाच्या उपसंचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. कमांडर सोनल स्काय डायव्हिंगही करतात. साहसी क्रीडा प्रकाराची त्यांना आवड आहे. ‘व्हाइट वॉटर राफ्टिंग चॅम्पियनशिप’मध्ये त्यांनी संरक्षण दलाचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावले.
सैन्यदलातील गणवेशाचे आकर्षण अनेकांना असते, तसेच सनदी अधिकाऱ्यांची लाल दिव्याची गाडीही अनेकांच्या स्वप्नात असते. पण त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात, त्यासाठी कशी तयारी करावी लागते, याबरोबरच काम करतानाचे अनुभव अश्विनी भिडे सांगतील. अश्विनी भिडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी गेली दोन दशके सनदी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत विविध विभागांमध्ये काम केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) मुलींमध्ये त्या भारतातून पहिल्या आल्या होत्या. २००८ ते २०१४ दरम्यान भिडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) कार्यरत होत्या. या काळात मुंबईच्या विकासाचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांनी तडीस नेले. अत्यंत तडफदार, निर्भीड आणि जबाबदार अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. या दोघींशी संवाद साधायची, त्यांचा प्रवास जाणून घ्यायची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. ‘झी २४ तास’ हे या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

’कमांडर सोनल द्रविड (नौदल)
’अश्विनी भिडे (आयएएस)
कधी : मंगळवार, २८ जुलै
वेळ : संध्याकाळी ५.००
स्थळ : यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा, मुंबई.
प्रवेश : विनामूल्य.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
काही जागा राखीव

सवरेत्कृष्ट ट्विटला भेटवस्तू
तुमच्या मते कर्तबगार स्त्रीची व्याख्या काय, हे ‘ट्विटर’च्या माध्यमातून आम्हाला कळवा. यासाठी http://www.twitter.com/LoksattaLive या लोकसत्ताच्या ट्विटर हँडलवरून #LSVivaLounge25 हा हॅशटॅग वापरून ट्वीट करा. सवरेत्कृष्ट ट्वीट करणाऱ्यांना मंगळवारी होणाऱ्या व्हिवा लाउंजच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविले जाईल.